नांदगावकर नाशकात : नगरसेवकांशी केली चर्चा

By Admin | Updated: September 27, 2016 01:32 IST2016-09-27T01:31:52+5:302016-09-27T01:32:22+5:30

मनपा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी

Nandgaonkar Nashik: Discussion with corporators | नांदगावकर नाशकात : नगरसेवकांशी केली चर्चा

नांदगावकर नाशकात : नगरसेवकांशी केली चर्चा

नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाचपणी सुरू केली असून, दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या नगरसेवकांशी व्यक्तिगत पातळीवर बंद खोलीत चर्चा केली. आतापर्यंत पक्षाचे १४ नगरसेवक पक्ष सोडून गेले असल्याने आणि येत्या काही दिवसांत काही नगरसेवक पक्षांतराच्या उंबरठ्यावर असल्याने डॅमेज कंट्रोलसाठीही नांदगावकरांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई वगळता उर्वरित ९ महापालिकांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे चाचपणी करण्यासाठी जबाबदारी सोपविली आहे. त्यात नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. नांदगावकर यांनी सोमवारी पक्षाच्या दहा ते बारा नगरसेवकांशी व्यक्तिगत पातळीवर बंद खोलीत चर्चा केली. मंगळवारी (दि.२७) उर्वरित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. नांदगावकर यांनी प्रामुख्याने, नाशिक महापालिकेत सत्ताधारी असताना मनसेच्या नगरसेवकांची कामे झाली किंवा नाही, कामांच्या पूर्णत्वाबाबत नगरसेवक समाधानी आहेत किंवा नाही, पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबतची कारणे, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक आदिंबाबत नगरसेवकांशी चर्चा केल्याचे समजते. दरम्यान, सध्या प्रारूप प्रभाग रचना पूर्ण होऊन ती येत्या १० आॅक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावेळी प्रभाग रचना स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पक्षांतराला वेग येणार असून त्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी मनसेला बसण्याची शक्यता आहे. मनसेचे काही नगरसेवक सेना-भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांनी नाशिकला पाठविल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Nandgaonkar Nashik: Discussion with corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.