ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने नांदगावी पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:36+5:302021-07-07T04:17:36+5:30
नांदगाव : गिरणा धरणावरील ५६ खेडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कार्यान्वित असणारा पाचशे केव्हीचा ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने योजनेवरील मालेगाव तालुक्यातील ...

ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने नांदगावी पाणीपुरवठा विस्कळीत
नांदगाव : गिरणा धरणावरील ५६ खेडी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कार्यान्वित असणारा पाचशे केव्हीचा ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने योजनेवरील मालेगाव तालुक्यातील ३९ गावांसह नांदगाव शहराचा पिण्याचा पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
शनिवारी (दि.५) रात्री योजनेच्या उपसा करणाऱ्या धरणावरील पाचशे केव्हीच्या ट्रान्स्फाॅर्मरमधून अचानक धुराचे लोळ येऊ लागले. त्यानंतर लगेचच आग लागली. आगीने रौद्र स्वरूप धारण केले असतानाही योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला; मात्र योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला. शहराचा पाणीपुरवठा त्यामुळे बंद पडला. याशिवाय नांदगाव तालुक्यातील एकोणवीस गावांसह मालेगाव तालुक्यातील एकूण ३९ खेड्यांच्या व आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या विभागातील अधिकाऱ्यांनी या घटनेची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने सोमवारीही (दि.५) ट्रान्स्फाॅर्मर दुरुस्त होऊ शकला नाही. निधीअभावी दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला असल्याची माहिती सांगण्यात आली. एकूणच ऐन पावसाळ्यात मात्र पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.