नांदगावचा भुयारी मार्ग पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:01+5:302021-07-17T04:13:01+5:30
नांदगाव : शहरात गुरुवारी (दि. १५) रात्री कोसळलेल्या पावसामुळे रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून काढण्यात आलेला सब-वे पाण्याखाली गेल्याने शहराच्या ...

नांदगावचा भुयारी मार्ग पाण्याखाली
नांदगाव : शहरात गुरुवारी (दि. १५) रात्री कोसळलेल्या पावसामुळे रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून काढण्यात आलेला सब-वे पाण्याखाली गेल्याने शहराच्या दोन भागांतील दळणवळण कोलमडून पडले. रेल्वे प्रशासनाच्या धोरणात्मक निर्णयान्वये फाटक बंद करून वाहतुकीला पर्याय म्हणून रेल्वेकडून बांधून देण्यात आलेला सबवे उन्हाळ्यातही पाणी साचत असल्याच्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
गुरुवार रात्रीच्या पावसाचे पाणी, सकाळी दहा वाजेपर्यंत निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने हलकी वाहने अडकून पडली. दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांना चार कि.मी.चा फेरा मारून शहराच्या दुसऱ्या भागात जावे लागले. पाच तासांत ३७ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. रेल्वेने उपसा करण्यासाठी बसविलेल्या मोटारीतून सकाळी दहा वाजेपर्यंत निचरा झालेला नव्हता. रेल्वेकडून अभियांत्रिकी त्रुटी राहून गेल्याने प्रत्येक लहान मोठ्या पावसात भुयारी मार्गात पाणी साठणे ही नित्याची बाब झाली आहे. किंबहुना पाऊस नसला तरी भुयार सदृश भागात पाझरलेले पाणी साचते. साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी एकमेव मोटार असून, सबवेची रचनाच अशी आहे की, पावसाचे पाणी दोन्ही बाजूकडच्या उतारावरून खोलगट भागात येते. पर्जन्यकाळात मोठ्या प्रवाहाला बाहेर जाण्यासाठी नैसर्गिक मार्गच नाही. केवळ पंपाने पाणी उपसणे एवढाच एकमेव उपाय आहे.
कोट....
सबवेमधील अडचणींना पर्याय म्हणून पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी बंद करण्यात आलेल्या रेल्वे फाटकाच्या जागेवर अतिरिक्त पादचारी पुलाची आवश्यकता असून, खासदार असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी हा पर्याय मार्गी लावावा.
- सुमित सोनवणे, संस्थापक, युवा फाउंडेशन
फोटो - १६ नांदगाव सबवे
पावसाच्या पाण्याखाली गेलेला भुयारी मार्ग.
160721\16nsk_28_16072021_13.jpg
फोटो - १६ नांदगाव सबवेपावसाच्या पाण्याखाली गेलेला भुयारी मार्ग.