नांदगाव पंचायत समितीत मनमानी
By Admin | Updated: November 24, 2015 23:09 IST2015-11-24T23:09:22+5:302015-11-24T23:09:54+5:30
शशिकांत मोरे यांची तक्रार

नांदगाव पंचायत समितीत मनमानी
नाशिक : नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असून, त्यांनी ठरावीक कर्मचाऱ्यांना त्याच त्या विभागात कामकाज करण्याची वारंवार संधी दिल्याने भ्रष्टाचार बळावत चालल्याची तक्रार नांदगाव पंचायत समितीचे सदस्य शशिकांत मोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव पंचायत समिती कार्यालय अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत कार्यरत असलेले लिपिक अनिल पाटील यांची तक्रारीच्या कारणास्तव बदली करण्यात आली होती; मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा अनिल पाटील यांची त्याच विभागात बदली झाल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत जरी अनिल पाटील कागदोपत्री काम करीत नसले तरीसुद्धा पडद्याआडून पाटील हेच कामकाज पाहत असल्याचा आरोप शशिकांत मोरे यांनी केला आहे. पाटील यांच्याकडे दिलेले टंचाई, समाजकल्याण या विभागाचे कामकाज तत्काळ काढून घेऊन त्यांना पुन्हा आस्थापना विभागात देण्यात यावे व ते इतर विभागांतील कामकाजात जो हस्तक्षेप करीत आहेत, ते त्वरित थांबविण्यात यावे. तसेच वरिष्ठ सहायक विनय सोनवणे व माजी सभापती विलास अहेर आणि अनिल पाटील हे तिघे मिळून पंचायत समितीचा कारभार करीत असल्याचा आरोप शशिकांत मोरे यांनी केला आहे. पंचायत समितीतील कामकाज नियमानुसार करून ठरावीक व्यक्तींचा हस्तक्षेप टाळावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)