सभापतीपदाची नांदगावी उत्कंठा
By Admin | Updated: February 28, 2017 00:46 IST2017-02-28T00:46:37+5:302017-02-28T00:46:55+5:30
नांदगाव : पंचायत समिती सभापतिपदाचा पहिला मान कोणाचा या प्रश्नाभोवती राजकारण पिंगा घालत आहे. उपसभापतिपदासाठीही रस्सीखेच सुरू आहे.

सभापतीपदाची नांदगावी उत्कंठा
नांदगाव : पंचायत समिती सभापतिपदाचा पहिला मान कोणाचा या प्रश्नाभोवती राजकारण पिंगा घालत आहे. उपसभापतिपदासाठीही रस्सीखेच सुरू आहे. आठ गण सदस्यांच्या पंचायत समितीमध्ये पाच जागांवर विजय मिळवून शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली व तीन जागा मिळवून भारतीय जनता पक्षाने प्रमुख विरोधी पक्षाची मान्यता मिळवली असली तरी पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचा एकही सदस्य सभागृहात नसल्याची ही दुर्मिळ वेळ आहे.
गेली पंधरा वर्षे पंचायत समितीच्या पडद्याआड दडलेल्या अनेक बाबी आता सेनेला अवगत होणार असल्या तरी समितीच्या प्रशासनाचा व राजकीय परिस्थितीचा प्रदीर्घ अनुभव असलेले विलास अहेर व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांचे स्थान महत्वपूर्ण ठरणार आहे. सुहास कांदे यांचे नेतृत्व कवडे आहेर यांना मान्य असले तरी जिल्ह्याच्या राजकारणातून वेळ काढून समितीच्या दैनंदिन घडामोडींमध्ये कांदे यांचा सहभाग तितकाच महत्वाचा असणार आहे.
पंचायत समिती सभापतिपद इतर मागसवर्ग प्रवर्ग महिलेसाठी राखीव असल्याने या पदावर विद्यादेवी पाटील व सुमन निकम यांची दावेदारी असल्याचे समजते. उपसभापती पदासाठी भाऊसाहेब हिरे व सुभाष कुटे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वी निकम यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली होती. यावेळी त्यांचा विजय पाटील यांच्या विजयापेक्षा अधिक मताधिक्क्याचा आहे. श्रीमती पाटील यांचा विजय कमी मताधिक्क्याचा आहे असे मानले तरी श्रीमती पाटील यांच्या निवडून येण्याच्या गुणवत्तेने समीकरणे शिवसेनेच्या फायद्याची झाली. ही त्यांच्या जमेची बाजू आहे.
एकंदरित आरक्षणामुळे सभापतिपदाची दावेदारी हा दोघींचा हक्क आहे. सभापतिपदाचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. आवर्तन पद्धतीने तो पार पडेल. मात्र पहिला मान कोणाचा, या प्रश्नाचे उत्तर भविष्यात दडले असले तरी सध्या राजकीय कवित्व सुरू असल्याने या चर्चांची झुळूक ग्रामीण भागात अंगावर येत आहे. (वार्ताहर)