नांदगावी लोकशाही दिनातले अर्ज प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:54+5:302021-06-17T04:10:54+5:30
प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश आहेत. यावेळी नगर परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक ...

नांदगावी लोकशाही दिनातले अर्ज प्रलंबित
प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश आहेत. यावेळी नगर परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम व इतर शासकीय विभाग यांच्याविषयी लोकांच्या तक्रारी ऐकून निर्णय घेतला जातो. तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यापासून दीड वर्षात दाखल तक्रार अर्जांवर कारवाई केलेली नाही किंवा लोकशाही दिनाचे आयोजन केले नाही, अशी तक्रार राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघाचे अभिषेक विघे यांनी केली आहे.
----------------------
समता परिषदेतर्फे तहसीलदारांना निवेदन
नांदगाव : अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने इतर मागास प्रवर्गातील समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना देण्यात आले आहे.
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मिळत असलेले शैक्षणिक नोकरीसाठी त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक अटीच्या पूर्ततेअभावी काही प्रमाणात मिळत असलेले राजकीय आरक्षण स्थगित केलेले आहे, ते मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली कैलास तुपे, राजेंद्र लाथे, अंकुश पगारे, सुभाष पवार, आयुब शेख, रमेश राठोड, रामचंद्र पवार, दीपक पगारे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
---------------------
उन्हाळ कांद्याची वाढली आवक
नांदगाव : बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून, भावातदेखील वाढ होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
नांदगाव बाजार समिती व उपबाजार समिती, बोलठाण येथे दि. १६ रोजी कांदा आवक ४८५ क्विंटल झाली. सरासरी १,७०० रु. प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त २,१०१ रु. प्रतिक्विंटल भाव मिळाला. हंगामातील सर्वांत जास्त कांदा भाव प्रथमच मिळाला.