नांदेडचा पाणीप्रश्न सुटला

By Admin | Updated: September 2, 2014 01:49 IST2014-09-02T01:05:06+5:302014-09-02T01:49:42+5:30

नांदेड: मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसाने नद्या- नाल्या भरून वाहत आहेत़ या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे़ परभणी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने

Nanded water dispute | नांदेडचा पाणीप्रश्न सुटला

नांदेडचा पाणीप्रश्न सुटला


नांदेड: मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसाने नद्या- नाल्या भरून वाहत आहेत़ या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे़ परभणी जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने पाण्याचा येवा वाढला असून विष्णूपुरी प्रकल्पात दर तासाला ३ टक्के साठा जमा होत आहे़ त्यामुळे नांदेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़
ऐन पावसाळ्यात नांदेडकरांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले होते़ विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ दलघमी पाणी शिल्लक राहिल्याने महापालिकेने आठवड्यातून एक वेळेस पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शविली होती़ त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ मात्र मघा नक्षत्राने अखेरच्या क्षणी साथ देवून हा प्रश्न सोडविला आहे़ पोळ्यापासून सुरू झालेल्या पावसाने गणेश चतुर्थीला जोरदार आगमन केले़ सलग सहा, सात दिवस झालेल्या पावसाने पिकांना जीवदान तर मिळालेच परंतु बहुतांशी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची साडेतीनशे मि़ मी़ च्या वर नोंद झाली आहे़
विष्णूपुरी प्रकल्पात शनिवारपासूनच पाण्याचा येवा सुरू झाला होता़ ३० आॅगस्ट रोजी दुपारपर्यंत प्रकल्पात ३०़३४ दलघमी पाणी जमा झाले होते़ त्यानंतर रविवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसाने प्रकल्पाची पाणीपातळी झपाट्याने वाढली़ सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात ६४़५८ दलघमी पाणी जमा झाले होते़ म्हणजेच प्रकल्प ८० टक्के पाण्याने भरला आहे़ प्रकल्पाची पाणीपातळी ३५३़९५ मीटरने वाढली आहे़ गोदावरी परिक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही तासात हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे़ दर तासाला ३ टक्के पाण्याचा येवा सुरू आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प पूर्णपणे भरल्यास उद्यापर्यंत प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़
नांदेड शहराचा पिण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या पावसाने विष्णूपुरी प्रकल्पात किती पाणीसाठा जमा झाले, याबाबत नांदेडकरांना उत्सुकता होती़ प्रकल्प दोन दिवसांत ८० टक्के भरल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले़ (प्रतिनिधी)
चार मोठ्या प्रकल्पांत ४१ टक्के साठा
नांदेड : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे चार मोठ्या प्रकल्पांमध्ये ४१़२२ टक्के पाणीसाठा आहे़ त्यामुळे पाणीटंचाईचे संकट आता दूर झाले आहे़
पावसाळा संपत आला तरी, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते़ तर दुसरीकडे पिण्यासाठीही पाण्याची टंचाई निर्माण झाली होती़ विष्णूपुरी जलाशयात तर फक्त ८़७३ दलघमी एवढे पाणी शिल्लक होते़ त्यामुळे शहरावर आठ दिवसाआड पाण्याची टांगती तलवार होती़
त्यानंतर मात्र २६ आॅगस्टपासून जिल्ह्यात दररोज पाऊस हजेरी लावत आहे़ त्यामुळे लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे़ सध्या इसापूर प्रकल्पात ४२९़६७७ दलघमी, लोअर मनार प्रकल्पात २९़७२१ दलघमी, अप्पर मनार प्रकल्पात २६़२३ दलघमी तर विष्णूपुरी प्रकल्पात ६४़५८ दलघमी एवढा पाणीसाठा आहे़ तर मध्यम प्रकल्पांमध्ये ५७़१६ दलघमी एवढे पाणी आहे़ त्यात आमदुरा प्रकल्प- २४़८३ दलघमी, दिग्रस-२१़८६ दलघमी, कारडखेड- ६़१३ दलघमी, कुंद्राळा- ३़३० दलघमी पाणी आहे़ तर बाभळी प्रकल्पात शून्य दलघमी पाणी आहे़ जिल्ह्यात ३१ आॅगस्ट ते १ सप्टेंबरला पहाटेपर्यंत २५़६८ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ त्यामुळे पाणी टंचाईचे संकट मात्र दूर झाले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Nanded water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.