नानासाहेब बोरस्तेंनी दाखल केला उपाध्यक्षपदाचा अर्ज
By Admin | Updated: March 13, 2017 01:49 IST2017-03-13T01:49:27+5:302017-03-13T01:49:39+5:30
सावाना निवडणूक : उमेदवारी अर्जविक्री व स्वीकृ तीचा आज अखेरचा दिवस

नानासाहेब बोरस्तेंनी दाखल केला उपाध्यक्षपदाचा अर्ज
नाशिक : आगामी पाच वर्षांसाठी होणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी विलास औरंगाबादकर, मधुकर झेंडे, प्र. द. कुलकर्णी यांनी अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज केल्याने यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
रविवार हा सुटीचा दिवस असल्याने अर्ज घेण्यासाठी गर्दी झाली होती. उपाध्यक्षपदासाठी अरुण नेवासकर, आकाश पगार, बी. जी. वाघ आणि नानासाहेब बोरस्ते यांनी अर्ज घेतले असून कार्यकारी मंडळासाठी शंशाक मदाने, देवदत्त जोशी, सुरेश गायधनी, शंकरराव बर्वे, अमोल बर्वे, मिलिंद चिंधडे, वसंत खैरनार, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सावळीराम तिदमे, कृष्णा शहाणे, सुभाष सबनीस, राजेश जुन्नरे यांनी अर्ज घेतले. निवडणूकीत नेमके किती पॅनल तयार होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. रविवार अखेरीस अध्यक्षपदासाठी सात, उपाध्यक्षपदासाठी १५ तर कार्यकारिणी मंडळासाठी शंभर अर्जांची विक्री झाली आहे, तर कार्यकारिणी मंडळासाठी ३९ अर्ज आणि उपाध्यक्षपदाचा एक अर्ज वाचनालयाला प्राप्त झाला आहे.
सोमवारी (दि. १३) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरण आणि स्वीकृतीचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
अर्ज भरण्याची आणि दाखल करण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली आहे तशी तशी उमेदवारांची चर्चा, भेटीगाठी आणि फोनवरून संवाद साधत पॅनल तयार करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवारांनी मतदार याद्यांची खरेदी करून सभासदांशी संपर्क साधण्यास तसेच अनुमोदक म्हणून स्वाक्षरी घेण्यास प्रारंभ केला आहे. (प्रतिनिधी)