नाना पाटेकर, कनक रेळे यांना ‘गोदावरी गौरव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 23:57 IST2016-02-06T23:55:21+5:302016-02-06T23:57:11+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठान : नाशिकच्या महाजन बंधूंचाही समावेश

नाना पाटेकर, कनक रेळे यांना ‘गोदावरी गौरव’
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर, प्रसिद्ध नृत्यांगना कनक रेळे यांना जाहीर झाला आहे. नाशिकचे महाजन बंधू, डॉ. शशिकुमार चित्रे, चेतना सिन्हा, डॉ. बाळकृष्ण दोशी यांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी येत्या १० मार्च रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सदर पुरस्कारांचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. लोकसेवा, चित्रपट/नाट्य, नृत्य/संगीत, चित्र/शिल्प, ज्ञान/विज्ञान, क्रीडा/साहस अशा सहा विविध क्षेत्रांत संस्मरणीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव केला जातो. कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून सन १९९२ मध्ये सुरू झालेले हे पुरस्कार म्हणजे त्या त्या मान्यवरांना केलेला ‘कृतज्ञतेचा नमस्कार’ असल्याचे तात्यासाहेब म्हणत. यंदा लोकसेवा क्षेत्रात साताऱ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, चित्रपट क्षेत्रात प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर, नृत्य क्षेत्रात नृत्यांगना कनक रेळे, विज्ञान क्षेत्रात मुंबईचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार चित्रे, क्रीडा क्षेत्रात अमेरिकेत खडतर सायकल शर्यत जिंकणारे नाशिकचे डॉ. हितेंद्र व महेंद्र महाजन, तर शिल्प क्षेत्रात अहमदाबाद येथील वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत डॉ. प्रकाश आमटे, गंगूबाई हनगल, हृषिकेश मुखर्जी, रघुनाथ माशेलकर यांसारख्या ७२ दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, विश्वस्त विनायक रानडे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.