नाना-काका हात जोडतो, एकोेपा ठेवा
By Admin | Updated: July 16, 2017 00:04 IST2017-07-15T23:36:24+5:302017-07-16T00:04:50+5:30
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व अजित पवार यांनी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांना कानपिचक्या दिल्या.

नाना-काका हात जोडतो, एकोेपा ठेवा
राष्ट्रवादी मेळावा : अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे व अजित पवार यांनी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांना कानपिचक्या देतानाच कारभार सुधारण्याचा इशारा दिला. दोन महिन्यांनंतर पुन्हा येऊन आढावा घेऊ, असा इशारा देतानाच पक्षांतर्गत खांदेपालटाचे सूतोवाचही केले. गजानन शेलार यांनी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीचा मुद्दा मांडला. तोच धागा पकडून प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे म्हणाले, पक्षात कोण आले, कोण गेले? याची तमा बाळगण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे होता. कारण अजितदादा येणार म्हटल्यावर असे चार हॉल सहज भरले असते. विद्यार्थी व युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या वयानुसारच झाली पाहिजे. वृत्तपत्रात आपल्याच पक्षातून विरोधात बातमी पसरविली जात असल्याचा आरोप रवींद्र पगार यांनी केला. त्यावर तटकरे म्हणाले, तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख आहात. तुम्हीच असे अस्थिर झाले तर कार्यकर्ते सैरभैर व्हायला वेळ लागणार नाही. दिलीप बनकरांना उद्देशून ‘काका, तुम्हाला हात जोडतो, आता तरी एकाच दिशेने पक्षाची वाटचाल सुरू करा’, असा मार्मिक टोला सुनील तटकरे यांनी मारला.
कसे म्हणता ‘आगे बढो’...
अजित पवारांनीही आपल्या भाषणातून पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यांचे भाषण सुरू असताना ‘आगे बढो’ची घोषणा झाली. त्याचवेळी काय चार आमदार निवडून येतात अन् आगे बढो म्हणता, असे म्हणताच सर्वत्र हशा पिकला. पक्षांतर्गत असलेले समज-गैरसमज दूर झाले पाहिजे. अमुकचा फोटो लावला नाही, तर तमुकाचे समर्थक नाराज. एक दोन फोटो लावायला तुम्हाला खर्च पडतो काय? आम्ही ४५ दिवसांत राज्य फिरलो, तुम्ही दोन महिन्यांत सर्व नियुक्त्या करा. पक्षांतर्गत बंडाळीला वेळीच आवर घातला पाहिजे, नाही तर त्याचा फटका पक्षाला बसतो.
उमेदवारी देताना आणि नियुक्ती देताना कोणताही आकस ठेवता कामा नये. नाही तर वॉर्डात आणि गावात निवडून न येणारे पदे मिरवतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आपण अजित पवार गट स्थापन करायला आलेलो नाही, असे त्यांनी सांगितले.
रवींद्र पगार यांना उद्देशून तुम्हाला हॉल मिळत नव्हता तर मला सांगायचे, मी हॉल मिळविला असता, असेही पवार यांनी सुनावले.