नागपूरच्या गतीमंद महिलेला नामपूरवासियांचा आधार

By Admin | Updated: April 28, 2017 01:31 IST2017-04-28T01:30:50+5:302017-04-28T01:31:38+5:30

एका बाजूला रक्ताच्या नात्याची वीण सैल होत असतानाच नामपूरकरांच्या माणुसकीची वीण मात्र खूपच घट्ट असल्याचा प्रत्यय नामपूरमध्ये नुकताच आला.

The name of the people of Nagpur | नागपूरच्या गतीमंद महिलेला नामपूरवासियांचा आधार

नागपूरच्या गतीमंद महिलेला नामपूरवासियांचा आधार

शरद नेरकर  नामपूर
एका बाजूला रक्ताच्या नात्याची वीण सैल होत असतानाच नामपूरकरांच्या माणुसकीची वीण मात्र खूपच घट्ट असल्याचा प्रत्यय नामपूरमध्ये नुकताच आला. उपचारासाठी मुंबईला नेत असल्याचे सांगणारा पुत्र जेव्हा मनमाड रेल्वेस्थानकावर आपल्या जन्मदात्रीला बेवारस सोडून निघून गेला, तेव्हापासून तब्बल ४९ दिवस एका अनोळखी गतीमंद महिलेचा आईच्या मायेने सांभाळ करून नामपूरवासियांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
गेल्या ४९ दिवसांपूर्वी मनमाड रेल्वे स्टेशनवर शोभा बोरकर या पन्नाशीच्या महिलेला तिचा मुलगा उतरवून निघून गेला. नागपूर येथून मुलगा आईला दवाखाण्याच्या कामासाठी मुंबईला घेवून निघाला होता. मात्र मनमाड रेल्वे स्टेशन येताच त्या निर्दयी मुलाने आपल्या मातेला वाऱ्यावर सोडून दिले. मुळातच गतीमंद असलेली ही महिला फारशी बोलत नव्हती. मनमाड पोलिसांनी तिला बोलते केले. तिने स्वत:चे गाव नागपूर सांगितले मात्र पोलिसांनी ऐकले नामपूर. त्यांनी त्या महिलेस नामपूर येथे नेऊन सोडले.
शोभा बोरकर ही धुणे-भांडी करणारी स्त्री! नागपूरपासून ४० कि.मी. अंतरावरील काटोल गावची. पतीच्या निधनाने ऐन तारूण्यातच संसाराचा डाव अर्ध्यावर मोडलेला. एक मुलगा, एक बहीण व आई असा छोटासा परिवार! आई व बहीण दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. व्यसनापायी मुलाने हक्काचे राहते घर विकून मुंबईला उपचारासाठी दवाखान्यात जायचे सांगून मनमाड रेल्वे स्टेशनवरच मातेला सोडून परागंदा झाला. नामपूरला शोभाबाई आली. बसस्थानकावर फिरता फिरता पेट्रोल पंपाजवळ आली. गाव प्रवेशाच्या रस्त्यावर सावलीच्या आडोशाला विसावली. तेथेच ती राहू लागली. कुणी काही दिले तर ते दोन घास पोटात घालायची.दोन-चार दिवसाच्या वास्तव्यात हॉटेल मालक मयूर ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते दिपक सोनवणे यांनी त्या महिलेची विचारपूस करून रोज तिला खायला देऊ लागले. ती गतीमंद असल्यामुळे तिच्या भावना कळत नव्हत्या. मात्र सौ. प्रियंका प्रमोद सावंत, सौ. अनिता विजय सावंत, सौ. रेवती प्रवीण सावंत, सौ. मनिषा शामकांत सावंत व वंदना अशोक सावंत या महिला आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी त्याच रस्त्यावरून जात असताना शोभाबाईचा केविलवाणा चेहरा त्या रोज बघत. एका स्त्रीची भावना फक्त एक स्त्रीच जाणू शकते. याप्रमाणे या पाचही भगिनींनी शोभाबाईला आलटून-पालटून आपल्या घरी नेले, तिचे स्नान, नाष्टा अशी शुश्रूषा सावंत कुटुंबियांतील स्नुषांनी केली. शोभाबाई जेव्हा घरी येई तेव्हा सुरूवातीला ती भेदरलेली वाटायची, अबोल राही. मात्र जेव्हा शोभाबाईस या महिलांबाबत विश्वास, आदरभाव वाटला तेव्हा ती त्यांच्याजवळ मन मोकळे करायची. तिच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर नागपूरला परत जाण्याच्या दिवशी या पाचही महिलांनी शोभाबाईस गोडधोड खाऊ घातले, नामपूरची साडी चोळी दिली. तिला जेव्हा निरोप देण्याची वेळ आली तेव्हा या महिलांबरोबरच पुरूषांचेही डोळे पाणावले.
मालेगावहून नागपूरच्या गाडीत बसविण्यासाठी प्रमोद सावंतांनी स्वत:च्या गाडीवर तिला मालेगावपर्यंत आणले. खर्चासाठी ५०० रुपये दिले. दुसऱ्या दिवशी तिच्या आईनेच नामपूरच्या महिलांना फोन करून सांगितले... ‘ताई माझी लेक आली हो! धन्य तुम्ही नामपूरकर! धन्य तुमची माणुसकी!

Web Title: The name of the people of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.