नामदेव महाराज मंडळातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: August 18, 2016 01:32 IST2016-08-18T01:31:03+5:302016-08-18T01:32:29+5:30
कृतज्ञता : शिंपी समाजातील धुरिणांचा सन्मान

नामदेव महाराज मंडळातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान
नाशिक : गंगापूररोड-कॉलेजरोड परिसरातील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने शिंपी समाजातील धुरिणांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक जाणीव ठेवून आयुष्य उजळून टाकणाऱ्या आदर्शवंतांना जीवनगौरव पुरस्कार देत मंडळाने कृतज्ञतेचा भाव व्यक्त केल्याचे गौरवोद्गार अ. भा. शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी यांनी यावेळी बोलताना काढले.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित सोहळ्यात मंडळाच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणारे शांतुषा डेव्हलपर्सचे संस्थापक शांताराम सावळे, माजी समाजाध्यक्ष एन. एन. बागुल, माजी समाजाध्यक्ष डी. व्ही. बिरारी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजाध्यक्ष विजय बिरारी यांनी सांगितले, आज सर्वच माणसे समाजाचे ऋण फेडतातच असे नाही. पण जी माणसे समाजासाठी जगतात त्यांचीच नोंद इतिहास घेत असतो. समाजबांधवांच्या खानेसुमारीचे प्रकाशन करण्यात आले. नंदलाल जगताप यांच्यासह समाजबांधवांनाही गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र वाडीकर, बापू निकुंभ, पंढरीनाथ नेरे, अरुण नेवासकर, मुकुंद मांडगे, सुनील जगताप, अमर सोनवणे, संजय खैरनार, संदीप खैरनार, विनय बिरारी, सावळे, महेंद्र बाविस्कर, विठ्ठल जाधव, राजेश जगताप आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रणिता निकुंभ यांनी केले.