ढकांबे गावात नगरभूमापन योजना लागू
By Admin | Updated: September 25, 2016 23:33 IST2016-09-25T23:33:05+5:302016-09-25T23:33:44+5:30
दिंडोरी : नाशिक विभागात प्रथमच संगणीकृत नकाशे वाटप

ढकांबे गावात नगरभूमापन योजना लागू
दिंडोरी : अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीजीपीएस व ई टिएस) प्रणालीद्वारे गावठाण मोजणी करण्यात येऊन तेथील मिळकतीचे संगणीकृत नकाशे बनविण्याच्या सरकारच्या महत्वकांक्षी नगरभूमापन योजना प्रकल्पांतर्गत दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावातील गावठाणाची मोजणी पूर्ण झाली असून सनद वाटप करण्यात आली आहे. नाशिक विभागात सर्वप्रथम हा ढकांबे गावात आधुनिक तंत्रज्ञान वापरून गावठाण मोजणी होत सदर ढकांबे गावात नगरभूमापन योजना लागू झाली आहे
सदर नकाशे हे अत्यंत अचूक असणार आहे. योजनेअंती बनलेले अभिलेख जसे मोजणी नकाशे,चौकशी नोंदवह्या, सनद,मिळकत पत्रिका हे सर्व संगणीकृत असून त्यात आज्ञावली बनविण्यात आली आहे. सदर सनदींचे नुकतेच प्रांताधिकारी उदय किसवे,तहसीलदार बाबासाहेब गाढवे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी भूमिअभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे यांनी नगरभूमापन योजना लागू करण्याबाबतचे कायदेशीर तरतुदी,सनद व मिळकत पत्रकाचे महत्व सांगितले. यावेळी बोलताना प्रांताधिकारी उदय किसवे यांनी सनद व मिळकतिपत्रका हा गावठाणातील मिळकतीचा मालकी हक्काबाबतचा निर्विवाद पुरावा असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी सनद प्राप्त करून घेऊन संग्रही ठेवावी असे आवाहन केले व सदर प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल भूमिअभिलेख विभागाचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रल्हाद आव्हाड, शंकर गायकवाड,विठ्ठल आव्हाड, शरद बोडके,शरद वाघ, राजाराम बोडके यांना प्रातिनिधिक स्वरूपात सनद वाटप करण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे ,तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड,सुदाम बोडके यांची भाषणे झाली.स्वागत सरपंच भाऊसाहेब गांगोडे, उपसरपंच मधुकर बोडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रल्हाद आव्हाड यांनी केले तर आभार उपअधीक्षक संजय धोंगडे यांनी मानले. यावेळी एकाच दिवसात 85 टक्के विक्र मी सनद फी वसूल करण्यात आली.(वार्ताहर)
अत्याधुनिक प्रणाली
भूमिअभिलेख विभागातर्फे सर्व गावठाण मोजणी हि अत्याधुनिक प्रणाली(डीजीपीएस व ई टिएस) याद्वारे करण्याबाबत २०११ मध्ये सर्व तालुका भूमिअभिलेख विभागाला सांगण्यात आले त्यानुसार दिंडोरी येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे यांनी ढकांबे गावाची निवड करत सदर गावाच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले त्यात स्थळिनश्चिती करत डीजीपीएस व ई टिएस प्रणालीद्वारे मोजणी करत संगणीकृत नकाशे करण्यात आले.