नगरचा लांडे खून खटला नाशिक न्यायालयात वर्ग
By Admin | Updated: August 12, 2014 02:03 IST2014-08-12T01:32:31+5:302014-08-12T02:03:12+5:30
नगरचा लांडे खून खटला नाशिक न्यायालयात वर्ग

नगरचा लांडे खून खटला नाशिक न्यायालयात वर्ग
नाशिक : अहमदनगर येथील बहुचर्चित अशोक लांडे खून खटला नाशिकच्या जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला असून, यात भाजपाच्या आमदारासह तत्कालीन महापौरांवर गुन्हे दाखल आहेत़ या खटल्यातील कागदपत्रांच्या तपासणीनंतर दोषारोपपत्र दाखल होणार आहेत़
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे लॉटरी विक्रेता अशोक धनराज लांडे या युवकाचा १९ मे २००८ रोजी निर्घृण खून करण्यात आला होता़ परंतु मोटार अपघातात या तरुणाचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते़ याचा संशय आल्याने अहमदनगरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी घटनेची छायाचित्रे औरंगाबाद वैद्यकीय रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवली होती़ त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर फिर्यादी शंकरराव राऊत यांच्या तक्रारीवरून भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले, तत्कालीन महापौर संदीप कोतकर, त्यांचे वडील भानुदास कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर, भाऊसाहेब उन्हवणे यांच्यासह १५ संशयितांवर लांडे याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला अहमदनगर न्यायालयात प्रलंबित होता़ या खटल्याचे काम नि:पक्षपातीपणे होण्यासाठी हा खटला नाशिक न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती़ त्यानुसार हा खटला नाशिक जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे़ न्या़ एस़ आऱ कदम यांच्या न्यायालयात तो चालणार आहे़ दरम्यान, कागदपत्रांच्या तपासणीनंतर खटल्याचे दोषारोपपत्र निश्चित होणार असून, त्यानंतर होणाऱ्या सुनावणीत साक्षीदार तपासले जाणार आहेत, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील श्रीधर माने यांनी दिली़
मालेगाव : शहरातील मुशावरत चौकाजवळ भरधाव वेगातील रिक्षाने धडक दिल्याने अब्दुुल वाहिद हा दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी मोहंमद हुसेन रा. नंदननगर याने फिर्याद दिली आहे.
त्यावरुन फरार रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.