निसाकावर विक्रीकर खात्याची टाच
By Admin | Updated: October 9, 2015 00:17 IST2015-10-08T23:37:02+5:302015-10-09T00:17:47+5:30
४८ कोटींची थकबाकी : कारखान्याची यंत्रसामग्री जप्त

निसाकावर विक्रीकर खात्याची टाच
नाशिक : आर्थिक डबघाईस आलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी खासगी व्यक्तीला भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची तयारी एकीकडे प्रशासक मंडळ व माजी संचालकांनी चालविलेली असतानाच, दुसरीकडे हा कारखाना आणखीनच गर्तेत सापडला असून, गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याने विक्री कराचा, तसेच व्हॅटचा भरणा न केल्याने थकीत कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी विक्रीकर विभागाने कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.
विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बॅँकेने जप्तीची कार्यवाही केल्याने व नाशिक
सहकारी साखर कारखान्याचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू असताना निफाड कारखान्यावरही अशा प्रकारची नामुष्की ओढवल्याने जिल्ह्णातील सहकार क्षेत्र मोडकळीस निघते की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. साधारणत: १९९५ पासून निफाड कारखान्याने ऊस खरेदी कर, तसेच कारखान्यातून निर्मित होणारी दारू, स्पिरीटची विक्री केल्यानंतर त्यावरील कराचाही भरणा वेळोवेळी केलेला नाही. विक्रीकर विभागाने यासंदर्भात कारखान्याशी पत्रव्यवहार करून पैशांची मागणी केली; परंतु कारखान्याचीच आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर विक्रीकर विभागाच्या अपर आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी यांनी थकबाकी वसुलीसाठी जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी कारखान्यातील डिस्टलरी विभाग, कॅल्शियम लॅक्टेट विभाग, कंपोस्ट प्रकल्प, लगुन्स, ई.टी.पी. विभाग, बायोगॅस प्रकल्प व इतर यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. याचबरोबर कारखान्याच्या मालकीच्या बारा जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरही बोझा चढविला आहे.
विक्रीकर विभागाने जप्त केलेली यंत्रसामग्री व जमिनींची आता कारखान्याला विक्री करता येणार नाही. त्याचबरोबर त्याचा वापरही करता येणार नाही. कारखान्याने येत्या ९० दिवसांत जर विक्रीकराचा भरणा केला, तर ही कारवाई टाळणे शक्य आहे, नाही तर जप्त मालमत्तेचे शासकीय मूल्यांकन काढल्यानंतर लिलावातून सदरची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मोहिमेत विक्रीकर सहआयुक्त एच. ए. बाखरे, उपआयुक्त दीपक वैष्णव यांच्यासह चेतन उगले, रावसाहेब साळवे, प्रमोद बुगदाने, आनंद नाईक आदिंनी सहभाग घेतला.