ना गुढी ना गोडवा, गावागावात सांत्वनात गेला पाडवा

By Admin | Updated: March 22, 2015 00:25 IST2015-03-22T00:24:58+5:302015-03-22T00:25:06+5:30

ना गुढी ना गोडवा, गावागावात सांत्वनात गेला पाडवा

Na Gudi na Godva, went to console the village | ना गुढी ना गोडवा, गावागावात सांत्वनात गेला पाडवा

ना गुढी ना गोडवा, गावागावात सांत्वनात गेला पाडवा

 कसबे सुकेणे : सोसायटीचे साडेसहा लाख रुपये कर्ज काढले, तीन लाखांचा इतर खर्च करीत शिमला मिरचीसाठी साडेनऊ लाख अडकविले; पण निसर्गाने मांडलेल्या खेळाने लाखाचे बारा हजार झाले... एका तासात सारी स्वप्ने अक्षरश: धुवून नेली, सांगा साहेब कर्ज क सं फेडायंच, तोंडातला घास हिरावून गेल्याने काहीही गोड लागत नाही... अख्खी बाग आडवी झाली.. सांगा साहेब कसा साजरा करू कसा आम्ही पाडवा... हे भावनाविवश शब्द आहे निफाड तालुक्यातील गारपीट व अवेळी पावसाने संकटाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांचे.
गारपीट व अवेळी पावसाने पुरते उद्ध्वस्त झालेल्या निफाड तालुक्यातील उगाव, वनसगाव, सारोळे या प्रातिनिधिक भागाची शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी पाहणी करीत नुकसानी माहिती जाणून घेत शेतकऱ्यांचे सांत्वन केले.
शनिवारी दुपारी सिंह यांनी उगाव, वनसगाव व सारोळे येथील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. गारपिटीने झोडपलेल्या द्राक्षपंढरीत आज सण साजरा झालाच नाही. वर्षभर ज्या द्राक्षवेलींवर प्रगतीचे स्वप्न फुलायचे त्या द्राक्षवेली गारपिटीने कोमजल्याने द्राक्षांचा गोडवा कधीच निघून गेला; पण आजचा पाडवा या भागात मंत्र्यांच्या सांत्वनातच गेला. मंत्रिमहोदयांचा ताफा आज १२ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळाहून उगाव, वनसगाव व सारोळे भागात आला. या भागातील वस्त्यावर आज सणाचा गोडवा कुठेही पाहावयास मिळाला नाही, मांगल्याची गुढी, साखरेच्या गाठींचा गोडवाही यंदाच्या गारपिटीने लुप्त झाला होता. सिंह यांनी सारोळ येथील ज्ञानेश्वर जेऊघाले, श्यामराव भोसले, वनसगाव येथील दामोदर शिंदे व उगावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. पानावलेले डोळे, चेहऱ्यावरील निरुत्साह असलेल्या शेतकऱ्यांना गारपिटीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हते. साहेब, पोटच्या पोराप्रमाणे वर्षभर जीव लावून द्राक्षबागा जोपासल्या, द्राक्षांच्या भरवश्यावर लाखोंचे गणित मांडले परंतु गारपिटीने हे गणित पुरते बिघडविले असून, द्राक्ष उत्पादक उद्ध्वस्त झाला असल्याचे यावेळी द्राक्ष उत्पादकांनी भावनाविवश होत सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Na Gudi na Godva, went to console the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.