मविप्रमध्ये प्रगतीचीच सरशी; समाज विकासला ‘नारळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:18 IST2017-08-14T23:44:36+5:302017-08-15T00:18:55+5:30
नाशिक : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवित समाज विकास पॅनलचा धूळधाण उडविली. सरचिटणीस पदासाठी शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. तर अध्यक्ष, सभापती, उपसभापती, चिटणीस या पदांवर एकतर्फी विजय मिळवित प्रगतीच्या कप-बशीने सरशी साधली.

मविप्रमध्ये प्रगतीचीच सरशी; समाज विकासला ‘नारळ’
नाशिक : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवित समाज विकास पॅनलचा धूळधाण उडविली. सरचिटणीस पदासाठी शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. तर अध्यक्ष, सभापती, उपसभापती, चिटणीस या पदांवर एकतर्फी विजय मिळवित प्रगतीच्या कप-बशीने सरशी साधली.
येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये सोमवारी (दि.१४) सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. पदाधिकारी पदांसाठी मतमोजणी जिमखाना हॉलच्या वरच्या बाजूस तर १३ संचालक पदांसाठी मतमोजणी जिमखान्याच्या तळमजल्यावर झाली. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीसाठी मतपत्रिकांची विगतवारी (विभागणी) करण्यात आली. त्यासाठी तब्बल सात तास लागले.
दुपारी चार वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यात तिसºया व चौथ्या फेरीत दिंडोरी व बागलाण तालुका संचालक पदाचे प्रगतीचे उमेदवार काही मतांनी पिछाडीवर पडले होते. मात्र नंतर त्यांनी पाचव्या फेरीपासून पिछाडी भरून काढत आठव्या फेरीअखेर निर्णायक आघाडी घेतली. चिटणीस पदाचे उमेदवार डॉ. सुनील ढिकले यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. पाचव्या फेरीत डॉ. सुनील ढिकले यांना नानासाहेब बोरस्ते यांच्यापेक्षा दोनशे मते कमी मिळूनही चार फेरीत ते ६०० मतांनी आघाडीवर असल्याने ४०० मतांची त्यांची आघाडी कायम होती. पुढे आठव्या फेरीअखेर ही आघाडी १२०० मतांनी वाढली. नाशिक ग्रामीण संचालक पदासाठी आठव्या फेरीअखेर सचिन पिंगळे यांनी निर्णायक ७७५ मतांची आघाडी घेतली होती. अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे यांचा डॉ. तुषार शेवाळे यांनी तब्बल ७१६ मतांनी पराभव केला. तर सभापती पदाच्या निवडणुकीत माणिकराव बोरस्ते यांनी दिलीप मोरे यांचा ३५५ मतांनी पराभव केल्याचे शेवटची माहिती येण्यापर्यंतचे वृत्त होते. उपसभापती पदासाठी राघो अहिरे यांनी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांचा पराभव केला.