सटाण्यातील ग्राहक संघाच्या माजी सभापतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 08:34 PM2020-05-14T20:34:44+5:302020-05-14T23:55:19+5:30

सटाणा : शहरातील सहकारी ग्राहक संघाचे माजी सभापती राजू दिनकर सरदार (५०) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Murder of former chairman of Satana Consumer Association | सटाण्यातील ग्राहक संघाच्या माजी सभापतीचा खून

सटाण्यातील ग्राहक संघाच्या माजी सभापतीचा खून

Next

सटाणा : शहरातील सहकारी ग्राहक संघाचे माजी सभापती राजू दिनकर सरदार (५०) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सरदार यांचा मृतदेह दोधेश्वर घाटात त्यांच्याच कारमध्ये आढळून आला असून, डोक्यात वार करून त्यांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.
सदर घटनेची माहिती कळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती व शहरातील व्यवसायिक राजू दिनकर सरदार यांची इंडिगो मांझा कार (क्रमांक एमएच ०४ ईएफ २४०३) शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील दोधेश्वर घाटात आढळून आली. गुरुवारी सकाळच्या सुमारास पोलीसपाटील यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले असता सरदार यांचा मृतदेह गाडीच्या मागील सीटवर आढळून आला. त्यांच्या डोक्यावर पाठीमागून बांधकामावरील टॉमीने दोन वार केल्याचे दिसून आले. टॉमी घटनास्थळी आढळून आली आहे. सरदार यांचा मोबाइलही मिळाला असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अजय महाजन आदींनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाने दिशा न दाखवल्याने खून गाडीतच केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
-------------------------------
अज्ञात बोलेरो गाडीची चर्चा
सरदार हे बुधवारी (दि.१३) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पोलीस चौकीवरून गप्पा मारत टिळकरोडने त्यांच्या कारने मार्गस्थ झाले. त्यानंतर सकाळी ही दुर्दैवी खबर मिळाल्यानंतर निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घटनेपासून हाकेच्या अंतरावर एक बोलेरो गाडी आणि तीन अज्ञात व्यक्ती उभ्या असल्याचे शिवारातील शेतकऱ्यांनी बघितल्याचे बोलले जात आहे. तर नामपूर रस्त्याने दोधेश्वर फाट्यावरून कोळीपाडामार्गे दोधेश्वरच्या जंगलात आल्यावर हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Murder of former chairman of Satana Consumer Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक