वडापाव विक्रेत्याकडून चहाटपरी चालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:20+5:302021-08-28T04:19:20+5:30

पंचवटी : चहा, वडापाव कमी किमतीने विक्री करतो म्हणून बदनामी करतो, अशी कुरापत काढून चहाटपरी चालकावर वडापाव ...

Murder of Chahatpari driver by Vadapav seller | वडापाव विक्रेत्याकडून चहाटपरी चालकाचा खून

वडापाव विक्रेत्याकडून चहाटपरी चालकाचा खून

पंचवटी : चहा, वडापाव कमी किमतीने विक्री करतो म्हणून बदनामी करतो, अशी कुरापत काढून चहाटपरी चालकावर वडापाव विक्रेत्याने मांडीवर धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. २६) सायंकाळी हिरावाडीतील कळसकरनगर परिसरात घडली आहे. या खून प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी त्रिकोणी बंगल्याचा पाठीमागे राहणाऱ्या वडापाव विक्रेत्या संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेनगर येथे राहणाऱ्या तुषार रघुनाथ काळे (३४) याचा मृत्यू झाला आहे. काळे याच्या तक्रारीवरून वडापाव विक्रेता संशयित आकाश मुन्ना काळे याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गंभीर मारहाण केल्याचा गुन्हा करण्यात आला होता. मानेनगरला राहणाऱ्या तुषार काळे यांची गेल्या अनेक वर्षांपासून कळसकर नगरला चहाटपरी असून काही दिवसांपूर्वी संशयित मुन्ना काळे यानेही परिसरात वडापाव, चहा विक्री व्यवसाय सुरू केला होता. दोघेही चहा, वडापाव व्यावसायिक असल्याने त्यांच्यात वाद

व्हायचे, दोघांमध्ये गुरुवारी व्यवसायावरून पुन्हा वाद झाला. त्यातून एकमेकांना शिवीगाळ होऊन वाद विकोपाला गेल्याने वडापाव विक्रेता

आकाश काळे याने कांदा कापायच्या धारदार चाकूने तुषारच्या डाव्या मांडीवर वार केला, यात तुषार गंभीर जखमी झाल्याने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अति रक्तस्राव झाल्याने त्याचा रात्री उशिरा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

इन्फो

व्यावसायिक वादातून घटना

चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तुषार काळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कळसकरनगर समोरील रस्त्यावर चहाटपरी सुरू केली होती. त्यानंतर परिसरातच राहणाऱ्या आकाश काळे यांनीदेखील कळसकर नगर भागात वडापाव विक्री सुरू केली. व्यावसायिक स्पर्धा निर्माण झाल्याने तुषार व आकाश यांच्यात यापूर्वी शाब्दिक चकमक उडाली होती. त्यातच आकाश कमी भावात वडापाव आणि चहा विक्री करतो असे म्हणून बदनामी करत असल्याच्या कारणावरून आकाशने कुरापत काढून तुषारवर चाकूहल्ला चढवून त्याचा खून केला. पोलिसांनी आकाश काळे याला अटक केली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आकाश काळे याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजते.

Web Title: Murder of Chahatpari driver by Vadapav seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.