पालिका प्रशासनाचा ‘डबलगेम’

By Admin | Updated: December 8, 2015 00:06 IST2015-12-08T00:06:06+5:302015-12-08T00:06:24+5:30

सदस्यांनी उधळविला डाव : घुसवाफसवीला विरोध, रस्ते विकासाला मंजुरी

The municipality administration's 'double game' | पालिका प्रशासनाचा ‘डबलगेम’

पालिका प्रशासनाचा ‘डबलगेम’

नाशिक : सदस्यांना प्रभागातील रस्ते विकासाचे गाजर दाखवितानाच केंद्र सरकारचे अमृत व स्मार्ट सिटी अभियान आणि राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेंतर्गत सुमारे २०३१ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळविण्याचा महापालिका प्रशासनाचा ‘डबलगेम’ महासभेत सदस्यांनी एकमताने उधळवून लावला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनीही प्रशासनाची घुसवाफसवी मान्य करत केवळ १९१.४३ कोटींच्या रस्ते दुरुस्ती व विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
मागील विशेष महासभेतच प्रशासनाने रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण व अस्तरीकरणासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. परंतु सदरचा विषय विशेष महासभा असल्याने तो पुढच्या सभेत घेण्याचे महापौरांनी आदेशित केले होते. त्यानुसार, सोमवारी झालेल्या महासभेत सदरचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सुमारे २०० कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा विषय असल्याने सदस्यांमध्ये खुशीची लहर उमटलेली होती; परंतु सदस्य सभागृहात अवतरले तेव्हा त्यांच्या हाती सुधारित प्रस्ताव ठेवण्यात आला आणि सदस्यांचे पित्त खवळले. प्रस्तावावरील चर्चेला प्रारंभ होण्यापूर्वीच सेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी आताच प्रस्ताव हाती पडलेला असताना सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावावर कशी चर्चा करणार, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली. सदर प्रस्ताव फेटाळण्याची सूचनाही बोरस्ते यांनी केली. त्यानंतर संजय चव्हाण यांनीही सदरच्या प्रस्तावातील घुसवाफसवीला विरोध दर्शवित केवळ रस्त्यांचा स्वतंत्र प्रस्ताव मांडण्याची मागणी केली. पडद्याआडून चालणाऱ्या कामाबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. प्रकाश लोंढे यांनी हरकतीचा मुद्दा नोंदवून घेण्यास भाग पाडत सभागृहाची दिशाभूल करण्याचा हा सारा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी रस्ते विकासाच्या प्रस्तावात पंचवटीवर जास्त भर असल्याचे सांगत विभागीय असमतोल असल्याची टीका केली. प्रा. कुणाल वाघ यांनी तर प्रशासनाने हा पोरखेळ चालविल्याबद्दल नाराजी दर्शविली. कल्पना पांडे यांनीही प्रशासनाचे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे असल्याचे सांगत प्रशासनावर प्रहार केले. माकपाचे तानाजी जायभावे यांनी केवळ रस्तेविकासाच्या कामांनाच मंजुरी देण्याची सूचना केली. विक्रांत मते यांनीही पंधरा मिनिटांपूर्वी हाती ठेवलेल्या हजारो कोटींच्या प्रस्तावावर कशी चर्चा करणार, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेने लॉटरीची तिकिटे घेतली आहेत काय? ज्यामुळे हा एकाएकी चमत्कार पाहायला मिळतो आहे, अशी टीपणीही मते यांनी केली. शशिकांत जाधव यांनी भाकरीला महाग असलेल्या महापालिकेने लाडवाचे जेवण समोर ठेवल्याबद्दल शंका उपस्थित केली. बडगुजर यांनीही तांत्रिक मुद्दा उपस्थित करत सदर विषयावर सभागृहात चर्चाच होऊ शकत नसल्याचे सांगितले. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही मनपा कोणासाठी चालविली जात असल्याचा सवाल केला. विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक यांनी तर प्रशासनाचा हा डबलगेम खेळण्याचा प्रकार असल्याचे सांगितले. अखेर महापौरांनीही प्रशासनाने रस्ते विकासाचा मूळ प्रस्ताव ठेवण्याऐवजी अन्य विषय का घुसविले, असा प्रश्न प्रशासनाला केला आणि अन्य विषय फेटाळून लावत केवळ १९१.४३ कोटी रुपयांच्या मूळ प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय जाहीर केला.

Web Title: The municipality administration's 'double game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.