लसीकरणासाठी महापालिकाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:52+5:302021-01-13T04:36:52+5:30
नाशिक : चालू महिन्यातच कोरोनाची लस उपलब्ध हेाण्याच्या शक्यतेने महापालिकेने जय्यत तयारी सरू केली असून, त्यादृष्टीने मंगळवारपासून (दि.१२) शासनाच्या ...

लसीकरणासाठी महापालिकाची जय्यत तयारी
नाशिक : चालू महिन्यातच कोरोनाची लस उपलब्ध हेाण्याच्या शक्यतेने महापालिकेने जय्यत तयारी सरू केली असून, त्यादृष्टीने मंगळवारपासून (दि.१२) शासनाच्या वतीने सुमारे ६० ते ७० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला. लसीकरणासाठी सहा ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, १५ पथके तयार करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने येत्या १६ जानेवारीपासून देशात लसीकरण करण्याचे ठरविले असून, त्यादृष्टीने महापालिकेनेदेखील तयारी आरंभली आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने सहा ठिकाणी कोरोना लस देण्याचे नियोजन असून, यात नवीन बिटको रुग्णालय, जुने बिटको रुग्णालय, पंचवटी विभागात इंदिरा गांधी रुग्णालय, सिडकोतील मोरवाडी रुग्णालय, कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, सातपूर येथील महापालिकेचे प्रसूती केंद्र याठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील खासगी आणि शासकीय आरोग्य सेवेतील दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले असून, १५ पथके तयार ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डॉक्टर, एक परिचारिका, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर व एक शिपाई असे पथक असणार आहे. एक पथक दिवसाला शंभर जणांचे लसीकरण करणार आहे. सहा दिवसांत दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
महापालिकेने लस प्राप्त झाल्यानंतर त्या राजीव गांधी भवनातच शीतपेटीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
इन्फो..
महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांंना लसीकरणाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे. तथापि, राज्य शासनाच्या वतीने पुन्हा या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात हे प्रशिक्षण देण्यात आले. यात कर्मचाऱ्यांबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता.