घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेचा तगादा
By Admin | Updated: November 2, 2015 23:10 IST2015-11-02T23:09:48+5:302015-11-02T23:10:24+5:30
सूचनापत्रांचे वाटप : थकबाकीदारांची बॅँक खाती सील करणार

घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेचा तगादा
नाशिक : दरवर्षी घरपट्टी वसुलीसाठी जानेवारी-फेबु्रवारीत वाटप होणारे सूचनापत्र महापालिकेने आॅक्टोबरमध्येच मिळकतधारकांना पाठविले असून, सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत घरपट्टी न भरल्यास संबंधिताला जप्ती वॉरंट बजावतानाच बॅँक खाती सील करण्याचीही कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.
नाशिक शहराची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल होताना महापालिकेला घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट गाठायचे आहे. त्यासाठी महापालिकेने आॅक्टोबरअखेर ३५ हजार मिळकतधारकांना घरपट्टी भरण्याबाबत सूचनापत्र पाठविले आहे. सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर मिळकतधारकांनी १५ दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्तीची नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतरही करभरणा न झाल्यास मालमत्ता जप्त करण्याबरोबरच संबंधितांची बॅँक खातीही सील केली जाणार आहेत. याबाबत सहाही विभागीय अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यात वसुलीबाबत करावयाच्या कारवाईविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. २५ हजाराच्यावर असलेल्या थकबाकीदारांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाणार असून, त्यांच्या पाठीमागे वसुलीचा तगादा लावला जाणार आहे. अन्य महापालिकांकडून वसुलीबाबत होणाऱ्या उपाययोजनांचाही अभ्यास करून त्या धर्तीवर नाशिकमध्ये अंमलबजावणी करण्याचा विचारही दोरकुळकर यांनी बोलून दाखविला.