शासकीय मदतीसाठी महापालिकेचा प्रस्ताव
By Admin | Updated: November 28, 2014 00:15 IST2014-11-28T00:14:51+5:302014-11-28T00:15:02+5:30
आयुक्त-महापौर बैठक : वारसांना नोकरीची मागणी

शासकीय मदतीसाठी महापालिकेचा प्रस्ताव
नाशिक : चेंबरमध्ये पडून मृत्युमुखी पडलेल्या तिघा कंत्राटी कामगारांच्या वारसांना शासकीय आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांच्या वारसांना पालिकेच्या सेवेत विशेष बाब म्हणून समाविष्ट करावे, अशा मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. तसेच ठेकेदाराने तातडीने आर्थिक मदत आणि विम्याच्या रकमेची नुकसानभरपाई वारसांना द्यावी, असा आदेशही त्यांनी दिला आहे.
महापालिके च्या ठेकेदाराच्या तिघा कंत्राटी कामगारांचा गंगापूररोडवरील भूमिगत गटारीच्या चेंबरची सफाई करताना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. सदर घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शवित रास्ता रोक ो आंदोलन केले. तब्बल चार तास चाललेल्या आंदोलनामुळे त्र्यंबक सिग्नलपासून तर जलतरण तलाव सिग्नलपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी आयुक्तांसोबत तातडीने त्यांच्या दालनात बैठक घेऊन सदर घटनेबाबत चर्चा केली. या बैठकीत आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागणीवरून आयुक्तांनी आर्थिक मदतीच्या प्रस्ताव व वारसांना सेवेत घेण्याबाबतच्या विशेष बाबीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर मुर्तडक, बग्गा व पालिका प्रशासनाचे उपआयुक्त विजय पगार यांनी जिल्हा रुग्णालयासमोर जाऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढली व त्यांना आयुक्तांचे लेखी पत्र वाचून दाखविले. त्यानंतर महापौरांनी या प्रकरणाच्या पाठपुरावा करण्याची हमी संतप्त आंदोलनकर्त्यांना दिली. विशेष बाब म्हणून या घटनेतील मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना शासकीय स्तरावरून विशेष अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे व वारसांना पालिका सेवेत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.
दरम्यान, मयत कामगारांच्या वारसांना महापालिका सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, गटनेता अजय बोरस्ते यांनी केली आहे, तर माजी महापौर दशरथ पाटील यांनी पावसाळी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या प्रकारामुळे सदर घटना घडली आहे. याबाबत शासनाकडे सखोल चौकशीसाठी तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)