पाणीटंचाईमुळे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन

By Admin | Updated: June 28, 2014 01:50 IST2014-06-28T01:31:35+5:302014-06-28T01:50:02+5:30

नाशिक : संभाव्य पाणीटंचाईमुळे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पालिकेने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.

Municipal corporation planning watercourses due to water scarcity | पाणीटंचाईमुळे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन

पाणीटंचाईमुळे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन

नाशिक : संभाव्य पाणीटंचाईमुळे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पालिकेने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर नियोजनावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी येत्या जुलैपासूनच पाणीकपातीचे धोरण राबविले जाण्याची शक्यता आहे. शहरात १५ टक्के पाणीकपात केली जाणार असल्याची दाट शक्यता आहे.
लांबलेल्या पावसामुळे तसेच पुढील आठवड्यातही पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने राज्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील धरणांनी तळ गाठला असून, मोठ्या प्रमाणात जलसाठा कमी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कालच मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणीकपातीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पाणीकपातीचे नियोजन करावे, असे सुचविल्याने कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने पाणीकपात नियोजन आराखडा तयार केला आहे.
गंगापूर धरणात असलेला पाणीसाठा हा येत्या आॅगस्टपर्यंत पुरेसा असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे, असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी कपातीचे नियोजन करण्याचे आदेशित केल्यानुसार महापालिकेने कपातीचा आराखडा तयार केल्याचे कार्यकारी अभियंता आर. के. पवार यांनी सांगितले.
मात्र या नियोजन आराखड्यावर महापौर अथवा आयुक्तांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याने त्यावर आज कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. महापालिकेला सध्या प्रभारी आयुक्त असून, महापौरही आज पालिकेत फिरकले नसल्याने कपातीबाबत कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. तथापि उद्या यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal corporation planning watercourses due to water scarcity