डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी
By Admin | Updated: November 15, 2014 00:38 IST2014-11-15T00:38:09+5:302014-11-15T00:38:46+5:30
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी
नाशिक : शहरात वाढत चाललेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत असून, आता डेंग्यूच्या प्रसाराबद्दल चौकशी करून तो अहवाल सादर करावा त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, अशा आशयाचे पत्र मनपा आयुक्तांनी आरोग्य उपसंचालकांना पाठविले आहे. शहरात वाढत चाललेली डेंग्यूची साथ आता आवाक्याबाहेर चालल्याचे दिसून येऊ लागल्यानंतर आयुक्तपदाची नुकतीच सूत्रे स्वीकारलेल्या गेडाम यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. त्यात साचलेल्या पाण्यात औषध फवारणी करणे, फॉगिंग मशीनने धूर फवारणी करणे यांसारख्या उपाययोजना त्वरित करण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी कर्मचारी कमी असतील तर तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याशिवाय घरातील टाक्यांमध्ये गप्पी मासे टाकण्यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून मासे मागवून घ्या, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. पाण्याची साठवणूक हा डेंग्यूच्या प्रसाराचा मुद्दा झाल्याने आता दर शनिवारी शहरात ड्राय डे पाळण्यात येणार असल्याची घोषणाही आयुक्तांनी केली.
शहरातील अनेक घरांमध्ये पाण्याची साठवणूक करण्यासाठी विविध साधने असल्याने त्यात डासांची उत्पत्ती होण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने त्या साधनांची आठ दिवसांतून एकदा तरी स्वच्छता करावी, असे आवाहन करीत नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे गेडाम म्हणाले. (प्रतिनिधी)