मनपा करणार वर्गवारी : स्ट्रक्चरल आॅडिट बंधनकारक
By Admin | Updated: March 16, 2017 00:58 IST2017-03-16T00:58:04+5:302017-03-16T00:58:23+5:30
धोकादायक अनधिकृत इमारतींवर कारवाई

मनपा करणार वर्गवारी : स्ट्रक्चरल आॅडिट बंधनकारक
नाशिक : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेमार्फत आता शहरातील धोकादायक अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जाणार असून, त्यासाठी अगोदर संबंधित इमारतींची वर्गवारी करून स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार असल्याची माहिती नगररचना विभागाकडून देण्यात आली आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना त्या-त्या शहरातील अनधिकृत धोकादायक इमारती पाडून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. शासन आदेशानुसार, अनधिकृत इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असल्याने त्या सर्व इमारती तत्काळ खाली करून तोडणे व्यवहार्य नाही, परंतु अशा इमारतींमुळे होणारी जीवितहानी विचारात घेता अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाईचा अग्रक्रम ठरविण्याच्या दृष्टीने इमारतींचे वर्गवारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी वर्गवारी इमारतींच्या बांधकामाच्या दर्जाच्या आधारावर करण्याच्या दृष्टीने अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये ज्या इमारती धोकादायक सिद्ध होतील त्यातील रहिवाशांना बाहेर काढून त्या इमारती पाडून टाकण्याची कारवाई करण्याचेही आदेश शासनाने काढले आहेत. अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाईचे सौम्य धोरण असल्याचा गैरफायदा घेऊन काही बांधकाम व्यावसायिक अनधिकृत इमारतींमध्ये मुद्दाम काही नागरिकांना वास्तव्यास आणून कारवाईतून बचाव करून घेत असल्याचेही शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनधिकृत इमारतीमध्ये जरी नागरिक वास्तव्यास आले असतील तरीही त्या बांधकामांच्या पाडापाडीची कोणतीही हयगय करू नये, तसेच अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अथवा पर्यायी निवाऱ्याचे उत्तरदायित्व संबंधित महापालिका अथवा शासन घेणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)