आयुक्तांविना पालिकेला ब्रेक

By Admin | Updated: May 23, 2014 00:43 IST2014-05-23T00:21:09+5:302014-05-23T00:43:30+5:30

नाशिक : आधी आचारसंहिता आणि आता पूर्णवेळ आयुक्तांची प्रतीक्षा यामुळे महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाला असून, अनेक छोटे-मोठे परंतु महत्त्वपूर्ण निर्णय रखडले आहेत.

Municipal Corporation Brak | आयुक्तांविना पालिकेला ब्रेक

आयुक्तांविना पालिकेला ब्रेक

नाशिक : आधी आचारसंहिता आणि आता पूर्णवेळ आयुक्तांची प्रतीक्षा यामुळे महापालिकेतील कामकाजावर परिणाम झाला असून, अनेक छोटे-मोठे परंतु महत्त्वपूर्ण निर्णय रखडले आहेत. इतकेच नव्हे तर नवीन कामांचे खर्च प्राकलन तयार करण्यास कोणताही विभाग तयार नसल्याने पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे अनेक महत्त्वाचे विषय प्रशासनाला बाजूला ठेवावे लागले. महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी आचारसंहिता कालावधीत काही वादग्रस्त निर्णय घेण्याचे केलेले धाडस त्यांच्या अंगाशी आल्याने त्यानंतर कोणत्याही खात्याचा अधिकारी निर्णय घेत नव्हता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आली. परंतु आता पूर्णवेळ आयुक्त नसल्याने खोळंबा झाला आहे. प्रभारी आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे आदिवासी विकास विभागाची राज्यस्तरीय जबाबदारी आहे. तरीही ते पालिकेत उपलब्ध होतात; परंतु तातडीच्या निर्णयापलीकडे अन्य कोणतेही निर्णय घेत नाहीत, अशी अडचण आहे. सिंंहस्थ कामांच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाची कामे पूर्णवेळ आयुक्त नियुक्त झाल्यानंतर मार्गी लागतील असे प्रभारी आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले होते. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपून आठवडा होत आला तरी नवीन आयुक्त नाहीत. पालिकेची कर्ज उभारणी, विमा योजना, हेल्पलाइन, घरपट्टीला सूट देण्याची योजना यामुळे ठप्प झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal Corporation Brak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.