नाशिक : कॉलेजरोडवरील थत्तेनगर ते किलबिल शाळेच्या दरम्यान खाद्यपेय विक्रेत्यांना हटविण्यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयाकडे वाढीव मुदत मागितल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांना येत्या गुरुवारी (दि.२०) स्वत: उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी (दि.१८) यासंदर्भात सुनावणी करण्यात आली. किलबिल व डॉन बॉस्कोच्या समोरच असलेल्या दिव्यदानजवळून थत्तेनगर येथे जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र त्याठिकाणी महापालिकेने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना परवानगी दिली असून, फेरीवाला क्षेत्रच तयार करण्यात आल्याने त्याठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. संस्थाचालक आणि पालकांनी अनेकदा मागणी करूनदेखील महापालिकेकडून फेरीवाल्यांना हटविले जात नसल्याने संतोष भगत आणि भावेश व्यास या दोन पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.महापालिकेने सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात परवानगी दिल्याचा दावा केला होता. मात्र महापालिका संबंधितांकडून पैसे वसूल करीत असून, त्याच्या पावत्याच याचिकाकर्त्यांचे वकील संदीप शिंदे यांनी सादर केल्या. दरम्यान, उच्च न्यायालयाने एका आठवड्याच्या आत अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले.असता महापालिकेच्या वतीने त्यापेक्षा अधिक कालावधी लागेल, असे सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने आयुक्त राधाकृष्ण गमे यांना गुरुवारी (दि. २०) उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
मनपा आयुक्तांना उद्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:39 IST