पालिकेचा स्वच्छता विभाग वाऱ्यावर
By Admin | Updated: July 25, 2014 00:42 IST2014-07-25T00:13:33+5:302014-07-25T00:42:23+5:30
भगूर : अधिकारी नसल्याने स्वच्छतेचे वाजले तीन तेरा

पालिकेचा स्वच्छता विभाग वाऱ्यावर
भगूर : स्वच्छता अभियानाचे राज्यस्तरीय पारितोषिक मिळविणाऱ्या भगूर पालिकेचा स्वच्छता विभाग सध्या वाऱ्यावर आहे. या विभागाला सध्या निरीक्षक नसल्याने केवळ मुकादमाच्या भरवशावर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे. सेनेच्या सत्तेत पालिकेचा स्वच्छता विभाग सक्षम व्हावा, अशी अपेक्षा आता भगूरकरांकडून केली जात आहे.
नगरपालिकेला स्वच्छता निरीक्षक नसल्याने पालिका हद्दीतील परिसराचा स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परंतु पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पालिकेत आता सेनेची सत्ता आल्याने सेनेने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.
वर्षभरापूर्वी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक नीलेश बाविस्कर यांची प्रशासन विभागात बदली झाली आहे. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे सध्या एका सफाई कर्मचाऱ्याला स्वच्छता मुकादम पदोन्नती देण्यात येऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्वच्छता कर्मचारी आपले ऐकत नसल्याने काम करणार कसे? असा प्रश्न उपस्थित करून या कर्मचाऱ्यानेच पदोन्नती नको म्हणून पालिकेला अर्ज दिला होता. या अर्जावर पालिकेच्या महासभेत चर्चादेखील झाली आहे. त्यामुळे एकूण भगूरमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या स्वच्छतेअभावी परिसरातील इंदिरा गांधी झोपडपट्टी, राजवाडा, नवीन वसाहत, भिलाटी, राहुरीरोड, आंबेडकर चौक परिसरातील शौचालये साफ केली जात नाहीत. तसेच नाल्यांचीदेखील स्वच्छता कित्येक दिवसांपासून झालेली नाही. पावसाळ्यात तरी नाल्यांची स्वच्छता होणे अपेक्षित होते; परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
शहरातील मध्यवर्ती असलेला शिवाजी चौक, मेनरोड, सुभाषरोड, इंदिरा गांधी चौक, मांगीरबाबा चौक, नेहरू पथ आदि वर्दळीच्या ठिकाणी व निवासी परिसरात जेथे नगरसेवक राहतात, अशा ठिकाणी मात्र स्वच्छता होते. घंटागाडी कर्मचारी याच ठिकाणचा कचरा उचलून स्वच्छता करतात. परंतु इतर ठिकाणची अवस्था बिकट आहे. (वार्ताहर)