मनपा प्रशासनाला आली जाग
By Admin | Updated: January 18, 2016 22:51 IST2016-01-18T22:44:13+5:302016-01-18T22:51:03+5:30
सद्भावना चौक : जलवाहिनीची दुरुस्ती

मनपा प्रशासनाला आली जाग
सिडको : येथील सद्भावना चौक दत्त मंदिराशेजारी असलेल्या जलवाहिनीला गळती होऊन यातून गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत ‘दै. लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मनपा प्रशासन जागे झाले. मनपा कर्मचाऱ्यांनी सुटीचा दिवस असतानाही पाइपलाइन दुरुस्ती करून पाणी गळती थांबविल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जून महिन्यापर्यंत नागरिकांना पाणी पुरावे यासाठी मनपाच्या वतीने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे; परंतु याच महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सद््भावना चौक दत्त मंदिराशेजारी असलेल्या जलवाहिनीला गळती लागल्याने गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
तसेच मनपाच्या संबंधित विभागास कळवूनही दखल घेतली जात नव्हती. यामुळे दररोज सकाळी परिसरातील संपूर्ण रस्त्याने पाणीच पाणी होत होते. परिसरातील गल्ली बोळात पाण्याचा सडाच पडलेला असल्याचे चित्र बघावयास
मिळत होते. परंतु दैनिक लोकमतमध्ये (दि.१७) रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याच दिवशी मनपाच्या वतीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. (वार्ताहर)