गृहमंत्र्यांच्या ताफ्यामुळे ताटकळले मुंडे-बावनकुळे
By Admin | Updated: July 15, 2015 01:37 IST2015-07-15T01:35:10+5:302015-07-15T01:37:54+5:30
गृहमंत्र्यांच्या ताफ्यामुळे ताटकळले मुंडे-बावनकुळे

गृहमंत्र्यांच्या ताफ्यामुळे ताटकळले मुंडे-बावनकुळे
त्र्यंबकेश्वर : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना विशेष सुरक्षा असल्यामुळे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर ग्रामविकास व महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना काही वेळ सभामंडपाच्या बाजूलाच ताटकळत उभे राहावे लागले. स्थानिक पोलिसांनी आदल्या दिवशी रात्रीपासूनच कुशावर्त परिसरातील दुकाने बंद करण्याचे आदेश स्थानिकांना दिले होते. तसेच ज्या रस्त्याने केंद्रीय गृहमंत्र्यांचे आगमन होणार होते तो मेनरोड, तेल्ली गल्ली परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. तसेच या रस्त्यावरील नागरिकांना त्यांची दुचाकी व चारचाकी वाहनेही घराच्या आत व गल्लीबोळात लावण्याचे फर्माण काढण्यात आले होते. ध्वजारोहणाचा पूजाविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कुशावर्तच्या बाजूलाच छोटेखानी व्यासपीठ उभारण्यात आले होते. सभामंडपापर्यंत फक्त केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या वाहनांचा ताफा सोडण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे त्यांच्यासाठी असलेल्या स्कॉर्पिओ वाहनातून गेले. यावेळी राजनाथसिंह यांनी त्यांच्या वाहनात महंत अवधेशानंदगिरीजी महाराजांसह अन्य एका महंतांना बसविले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा सुसाट निघून गेला. इकडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सभामंडपापासून पायी चालत वाहनांची प्रतीक्षा करीत होते. त्यांची वाहने सभामंडपासून दूर अंतरावर लावण्यात आली होती. त्यामुळे मुंडे आणि बावनकुळे यांना नाइलाजास्तव काही अंतर पायपीट करावी लागली. हीच संधी साधत त्र्यंबकेश्वर येथील भाजपाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करीत फोटोसेशन उरकून घेतले. एका पदाधिकाऱ्याच्या वयोवृद्ध नातलग महिलेने तर चक्क पंकजा मुंडे यांना मिठीच मारली. त्यानंतर काही वेळाने पंकजा मुंडे आणि चंंद्रशेखर बावनकुळे यांना लालदिव्याचे वाहन असलेली इनोव्हा कार घेण्यासाठी आली. त्यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी तडक ओझर विमानतळ गाठण्यासाठी त्र्यंबकेश्वर सोडले.(विशेष प्रतिनिधी)