मुंबई महाराष्ट्रातच राहणार

By Admin | Updated: February 27, 2015 22:58 IST2015-02-27T22:57:52+5:302015-02-27T22:58:41+5:30

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : अरुण साधू यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

Mumbai will remain in Maharashtra | मुंबई महाराष्ट्रातच राहणार

मुंबई महाराष्ट्रातच राहणार

नाशिक : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात विदर्भाने हौतात्म्य पत्करल्यानेच मुंबई महाराष्ट्रातच राहिली. या हौतात्म्याचा इतिहास सांगणारे आपण मुख्यमंत्री असून, आपण या पदावर असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, तिला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठी साहित्यातील सर्वोच्च अशा ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांना ‘जनस्थान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सौ. अरुणा साधू, ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक दिनकर गांगल, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह लोकेश शेवडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी १९६० मध्ये १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले; मात्र विदर्भ हा त्यातील १०६वा हुतात्मा आहे. पंडित नेहरू यांनी ‘महाराष्ट्र एकसंध राहिला, तर मुंबई महाराष्ट्रात राहील’ अशी अट घातली होती. विदर्भाने हे मान्य केल्यानेच मुंबई महाराष्ट्रात राहिली. विदर्भाच्या या हौतात्म्याचा इतिहास सांगणारा मी मुख्यमंत्री असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही.
मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार नाही. इतिहासात डोकावल्यास दोन प्रकारच्या भाषा टिकल्याचे समोर येते. एक म्हणजे आक्रमणकर्त्यांची भाषा आणि दुसरी जगण्याची व्यवस्था निर्माण करणारी
भाषा.
मराठी भाषा कधी कोणावर आक्रमण करू शकत नाही; पण मराठीला व्यवहाराची भाषा बनवता येईल. मराठी साहित्याने माणूस आनंदी वा अंतर्मुख होतो; पण ही भाषा जगण्याला मदत करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चीन, जपान या देशांनी आपल्या भाषांना जगण्याचे साधन बनविले. आधुनिक जगातील माहिती तंत्रज्ञान त्यांनी आपल्या भाषेत आणले. आज गुगलवर एखादी माहिती इंग्रजीत चटकन मिळते; मराठीत तसे होत नाही. आपल्याला हे निर्माण करावे लागेल. शासन अशा प्रतिभावंतांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
 

Web Title: Mumbai will remain in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.