मुंबई नाक्यावर जल्लोष; सत्ता मिळाल्याचा आनंद
By Admin | Updated: March 14, 2017 17:02 IST2017-03-14T17:02:45+5:302017-03-14T17:02:45+5:30
वसंत गिते यांच्या सत्तेतील सहभागामुळे नेहमीच राजकीय गर्दीने फुलून जाणारा परंतु गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय विजनवास सोसणाऱ्या मुंबई नाक्यावर मंगळवारी कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली.
मुंबई नाक्यावर जल्लोष; सत्ता मिळाल्याचा आनंद
इंदिरानगर : वसंत गिते यांच्या सत्तेतील सहभागामुळे नेहमीच राजकीय गर्दीने फुलून जाणारा परंतु गेल्या अडीच वर्षांपासून राजकीय विजनवास सोसणाऱ्या मुंबई नाक्यावर मंगळवारी कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. गिते यांचे पुत्र प्रथमेश याची नाशिकच्या उपमहापौरपदी निवड झाल्याने मुंबई नाक्याला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली.
वसंत गिते यांच्या राजकीय कारकिर्दीला मुंबई नाका कायमच साक्षीदार राहिला असून, नगरसेवकपदी त्यांची झालेली निवड असो की, शहराचे प्रथम महापौरपद त्यांनी भूषविले असो, मुंबई नाक्यावर कार्यकर्त्यांचा राबता कायमच राहिला. शहरातील राजकारणाचे व सत्तेचे अनेक निर्णय, गुप्त खलबते याच मुंबई नाक्यावर शिजले. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गिते आमदार झाल्याने तर मुंबई नाका हा राजकारणाचा केंद्रबिंदू बनून राहिला, त्यातच २०१२ च्या नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेच्या घोडदौडीला मुंबई नाक्यावरूनच पाठबळ मिळाले व महापालिकेची सत्ता ताब्यात आल्यानंतर मुंबई नाक्यावर मनसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. महापौरपद असो वा स्थायी समितीचे सभापती असो या पदांचा फैसला याच ठिकाणाहून होत असताना, राजकारणाचे फासे उलटे पडले. गिते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले, त्यांनी मनसेची साथ सोडली, परिणामी त्यांचे राजकीय अस्तित्वही गेली अडीच ते तीन वर्षे जवळ जवळ संपुष्टात आले. नाईलाजास्तव भाजपात त्यांनी प्रवेश केल्याने पुन्हा मुंबई नाक्याच्या राजकीय केंद्रावर शिक्कामोर्तब झाले. त्याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. प्रथमेश गिते यांची उपमहापौरपदी निवड होणार असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दोन दिवसांपासूनच बळावल्याने मुंबई नाक्यावर त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली.