मुखेडला शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
By Admin | Updated: June 26, 2017 22:51 IST2017-06-26T22:51:43+5:302017-06-26T22:51:43+5:30
शेतात खेळत असताना शेततळ्यात पडले;मुखेड येथील घटना

मुखेडला शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतात खेळत असताना शेततळ्यात पडलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़२६) सायंकाळी पिंपळगाव बसवंतजवळील मुखेड गावात घडली़ खंडू रमेश दहिले (१४) व कार्तिक रमेश दहिले (१२, रा. दोघेही मुखेड) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघा भावांची नावे आहेत़
पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुखेड येथील सुनील किसन कदम यांच्या शेतात रमेश दहिले हे मजुरीचे काम करतात़ सोमवारी दहिले कुटुंबीय नेहेमीप्रमाणे मजुरीसाठी गेले होते़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतात खेळत असलेले खंडू व कार्तिक हे दोघे सख्खे भाऊ शेततळ्याजवळ गेले व पाय घसरून तळ्यात पडले व बुडाले़ यावेळी त्यांच्याजवळ कोणीच नसल्याने सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़
शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेले खंडू व कार्तिक हे दोघेही भाऊ दुलाजीनाना आश्रमशाळेत इयत्ता सहावी व आठवीच्या वर्गात शिकत होते़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़