मुकणे पाणी योजना मार्गी लागणार

By Admin | Updated: October 16, 2015 00:15 IST2015-10-16T00:02:48+5:302015-10-16T00:15:41+5:30

महापौरांचे संकेत : मनसेच्या बैठकीत चर्चा, शिवसेना पडणार एकाकी

The Mukesh Water Scheme will be started | मुकणे पाणी योजना मार्गी लागणार

मुकणे पाणी योजना मार्गी लागणार

नाशिक : गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून रखडलेली मुकणे पाणीपुरवठा योजना अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असून, येत्या शनिवारी (दि.१७) होणाऱ्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब होण्याचे स्पष्ट संकेत महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले आहेत. महासभेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी मनसेच्या नगरसेवकांची बैठक होऊन मुकणेप्रश्नी ठाम भूमिका घेण्याचा निर्णय झाला. दरम्यान, मुकणे पाणी योजनेला शिवसेना वगळता अन्य पक्षांचे समर्थन लाभण्याची शक्यता असल्याने या साऱ्या प्रकरणात शिवसेनेला एकाकी पाडण्याचीही रणनीती अवलंबिली जाण्याची चर्चा आहे.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. नेहरू अभियान बंद होऊनदेखील राज्य सरकारने सन २०१३ मध्ये सादर केलेल्या फेरप्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर २०१४ मध्ये जाहीर निविदाप्रक्रिया राबविली असता मे. लार्सन अ‍ॅण्ड टुर्बो लिमिटेड, चेन्नई या कंपनीची २६९ कोटी रुपये इतक्या रकमेची निविदा मान्य करण्यात आली होती. दरम्यान, निविदाप्रक्रियेत अनियमितता झाल्याची आणि अनेक तांत्रिक बदल करण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आदिंनी शासनदरबारी हा विषय नेला होता. या तक्रारीवरून शासनाच्या नगरविकास विभागाने निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र, नंतर स्थगिती उठवत महापालिकेला कोणतीही आर्थिक झळ पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशित केले होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच शासनाने स्थगिती उठवूनही मुकणेप्रश्नी निर्णय होत नसल्याने सत्ताधारी मनसेच्या भूमिकेबाबतही उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातच, निविदाधारक एल अ‍ॅण्ड टी कंपनीने ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्या, अन्यथा काम करणे शक्य नसल्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, प्रशासनाकडून एल अ‍ॅण्ड टीकडून मुदतवाढ मागवून घेतल्यानंतर आता अतिरिक्त ३६ कोटींच्या खर्चासह तांत्रिक बदलास मान्यता मिळण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला आहे. शिवसेनेने निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत आपली भूमिका कायम ठेवत त्यास विरोधाचा पवित्रा घेतला असताना मनसेच्या बैठकीत मुकणे पाणी योजनेला अंतिम रूप देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे, मुकणे पाणी योजना अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The Mukesh Water Scheme will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.