दिंडोरी तहसीलमध्येच चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:38 IST2018-07-20T00:37:39+5:302018-07-20T00:38:33+5:30
वरखेडा : सद्यस्थितीत सर्वत्रच जोरदार पाऊस बरसत असून, दिंडोरी तहसील कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांत चिखलाचे साम्राज्य वाढले आहे.

दिंडोरी तहसीलमध्येच चिखलाचे साम्राज्य
वरखेडा : सद्यस्थितीत सर्वत्रच जोरदार पाऊस बरसत असून, दिंडोरी तहसील कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांत चिखलाचे साम्राज्य वाढले आहे.
पावसाळ्यात तहसील कार्यालयाबरोबरच अन्य शासकीय कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून, पाण्याची डबकी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे साथीचे आजार पसरू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असताना शासकीय कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दिंडोरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांनो, पाय धुवा मगच प्रवेश करा, असा फलक लावण्यास शासकीय यंत्रणा विसरली काय, असाही प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे पंचायत समितीकडे जाणाऱ्या निळवंडी रस्त्याला पडलेले खड्डे, एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे जाताना चिखल तुडवत जावं लागतं.
शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेबरोबरच लोकप्रतिनिधींचा व शासकीय अधिकारीवर्गाचा वावर असताना ही बाब त्यांच्या कशी लक्षात येत नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून, यावर काही उपाययोजना होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.