म्युकरच्या शस्त्रक्रियेसाठीची उपकरणे सिव्हीलला पाेहोचण्यास विलंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:12+5:302021-06-01T04:12:12+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील शस्रक्रियेसाठीचा विभाग येत्या आठवडाभरात कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जाहीर करण्यात ...

म्युकरच्या शस्त्रक्रियेसाठीची उपकरणे सिव्हीलला पाेहोचण्यास विलंब !
नाशिक : जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील शस्रक्रियेसाठीचा विभाग येत्या आठवडाभरात कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र म्युकरच्या एन्डोस्कोपिक शस्त्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे पोहोचण्यास विलंब लागत असल्याने सिव्हीलमध्ये येणाऱ्या म्युकरच्या पुढील स्टेजच्या रुग्णांना अन्यत्र न्यावे लागत आहे. म्युकरच्या पुढील स्टेजमधील रुग्णांवर प्रथम शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य असते, मात्र सिव्हीलमध्ये ती सुविधा नसल्याने रुग्णांना आडगाव मेडिकल कॉलेज, एसएमबीटी मेडिकल कॉलेज किंवा अन्य खासगी रुग्णालयांकडे जावे लागत आहे.
म्युकरमायकोसिस रुग्ण आढळून येण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यातील आठ रुग्णालयांचा समावेश जनआरोग्य योजनेत केला आहे. त्यात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह, मालेगावचे शासकीय रुग्णालय, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, एसएमबिटी रुग्णालय यासह नामको हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल आणि वाेक्हार्ट हॉस्पिटल यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ऑपरेशन्ससाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग अस्तित्वात नव्हता. तसेच त्यासाठी लागणाऱ्या एन्डोस्कोपिक शस्त्रक्रियांसाठीची उपकरणे मिळण्यासदेखील विलंब होत असल्याने सामान्य नागरिक सिव्हीलमध्ये गेल्यास त्यांना आडगाव मेडिकल कॉलेज, एसएमबीटी रुग्णालयांमध्ये जाण्यास सांगण्याची वेळ जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनावर येत आहे. त्यामुळे एकीकडे ऑपरेशन थिएटरची सज्जता असली तरी एन्डोस्कोपिक सर्जरीची उपकरणे मिळेपर्यंत जिल्हा रुग्णालयात केवळ सल्ला आणि मार्गदर्शन सुविधाच उपलब्ध राहणार आहे. डोळा, नाक, कान, घसा किंवा दंततज्ज्ञांची सुविधा सिव्हीलमध्ये असल्याने त्याबाबतच्या शस्त्रक्रिया पुढील आठवड्यापासून जिल्हा रुग्णालयातच करण्यात येणार आहेत. परंतु, जिल्हा रुग्णालयाकडे न्यूरो सर्जन्सचा अभाव असल्याने मेंदूपर्यंत आजार गेलेल्या पुढच्या स्टेजला गेलेल्या रुग्णांना आडगाव मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातच पाठविले जाणार आहे.
कोट
एन्डोस्कोपिक सर्जरीची उपकरणे पोहोचण्यास विलंब होत असल्याने जिल्हा रुग्णालयात म्युकरच्या शस्त्रक्रिया सध्या करता येत नाहीत. मात्र, आठवडाभरात उपकरणे पोहोचल्यानंतर त्या करता येणार आहेत. सिव्हीलमध्ये सध्या नेत्र, दंत आणि कान-नाक-घसा तज्ज्ञ असले तरी आवश्यकतेनुसार अजून काही तज्ज्ञांना बाहेरुन सामाजिक जाणिवेतून आणून ऑपरेशन्सदेखील केली जातील. शासनाने काही विशेष मार्गदर्शक तत्त्वे दिल्यास त्यानुसार त्या संबंधित तज्ज्ञांना तसा मोबदलादेखील दिला जाईल.
डॉ. अशोक थोरात, जिल्हा रुग्णालय