एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:06+5:302021-07-07T04:17:06+5:30
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण देत वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ ...

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर !
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण देत वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ गटातील अधिकारी पदासाठी होणारी एमपीएससी परीक्षा परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरातून विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला होता. आता हीच परिस्थिती पुणे येथे परीक्षेची तयारी करणाऱ्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे निर्माण झाली आहे.
प्रशासकीय सेवेतील जागा रिक्त असतानाही एमपीएससीच्या परीक्षा नियमितपणे होत नसून पात्र उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जात नसल्याने नाशिक जिल्ह्यातून या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मागील दोन वर्षांत तीनदा परीक्षा रद्द झाल्यानंतर चौथ्यांदा मार्च २०२१ मध्ये परीक्षा झाली. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या नियोजनाविषयी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा पात्र विद्यार्थ्यांच्या नियुक्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतो आहे.
--
ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार?
कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने अद्याप क्लसेसला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे क्लासही सध्या
ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून अशाप्रकारे ऑनलाईन क्लास सुरू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासापासून दूर जात असून ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार असा प्रश्न विद्यार्थी व क्लासचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
----
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले !
परीक्षा होत नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुटुंबासोबतच समाजाचाही दबाव वाढत असून त्यांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होत आहे. अभ्यासासाठी वर्षानुवर्ष दूर राहून कटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास करतात. परंतु, परीक्षा होत नसल्याने उमेदवार वयोमर्यादेच्यापलीकडे जात असून त्यांच्यासमोरील अन्य पर्यायही संपुष्टात येतात. त्यामुळे नैराश्य वाढत आहे. उत्तीर्ण ३३० उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत असताना पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत नाही. त्यामुळे भविष्यात क्षमता असलेले शासकीय सेवेकडे न वळता अन्य क्षेत्रांना प्राधन्य देऊ लागतील.
- मंगेश जाधव , एमपीएससी उमेदवार
---
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची लवकरात लवकर परीक्षा होणे आवश्यक आहे. चार ते पाच वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांच्यावर नातेवाईक व समाजाच्या दबावामुळे तणाव निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांची वयोमर्यादा पूर्ण होत असल्याचा विचार करून शासनाने संकटावर मात करून परीक्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांनीही टोकाचे पाऊल न उचलता संयम ठेवून या संकटावरही मात करण्याची गरज आहे.
- धनंजय राऊत, एमपीएससी उमेदवार
---
क्लासचालकही अडचणीत
प्रत्यक्ष क्लास बंद असल्याने क्लास चालकांसमोर जागेचे भाजे, कर्जाचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे वेतन असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून क्लासचालकही अडचणीत आले आहेत. त्याचप्रमाणे क्लास सुरू असताना झेरॉक्स, चहा स्टॉल, मेस, हॉस्टेल चालकांनाही रोजगार उपलब्ध होत असतो. आता त्यांच्या रोजगारावरही परिणाम होत असून क्लासचालकांनाही कर्मचारी कमी करण्याची वेळ आली आहे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सूज्ञ असतात. ते कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून शकतात. त्यामुळे आता शासनाने प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षा क्लास सुरू करण्यास परवानगी देण्याची गरज आहे.
-राम खैरनार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
---
कोरोना संकटामुळे सध्या क्लासेस बंद असून ऑनलाईन क्लासेसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ क्लासेसला परवानगी देऊन एमपीएससी पपीक्षांचेही नियोजन करणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी तीन ते चार वर्षांपासून परीक्षेची तयारी करत असतात. क्लास बंद असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. त्यामुळे शासनाने स्पर्धा परीक्षांचे क्लास सुरू करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे.
- किशोर डांगे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
---
यार्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार ?
पुण्यात एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर सरकारने ३१ जुलैपर्यंत रिक्त जागा भरण्याचे आश्वासन विधानसभेत दिले आहे. परंतु, यावर्षीच्या परीक्षांचे वेळेपत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे यवर्षीच्या परीक्षा कदी होणार असा सवाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.