खासदारांनी वाचला मुख्यमंत्र्यांपुढे तक्रारींचा पाढा
By Admin | Updated: November 21, 2014 00:06 IST2014-11-21T00:03:32+5:302014-11-21T00:06:42+5:30
अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाईसह सिंहस्थाचा निधी मिळावा

खासदारांनी वाचला मुख्यमंत्र्यांपुढे तक्रारींचा पाढा
नाशिक : मुख्यमंत्र्यांसोबतच्या तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत राज्यभरातील खासदारांनी आपापल्या भागातील विविध प्रश्न व समस्या मांडल्या. त्यात नाशिकच्या दोन्ही खासदारांनी विमान, रेल्वेसेवेसह आगामी सिंहस्थासाठी केंद्राकडे भरीव निधीची मागणी केली, तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. राज्यातील लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (दि. २०) सकाळी साडेअकरा वाजता बोलावली होती. या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह राज्यातील एकूण ५६ खासदार उपस्थित असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असून, आपण केंद्राकडे २३७८ कोटींची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या निधीसाठी पाठपुरावा करावा, तसेच संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व खासदारांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घ्यावी. नाशिक-सुरत, नाशिक-डहाणू, नाशिक-पुणे या रेल्वेमार्गांसाठी मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, तसेच मनमाड-इंदूर रेल्वेमार्गास मंजुरी मिळाली असून, महाराष्ट्र सरकारने ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी केली आहे