महिला सुवर्णकारही आंदोलनात
By Admin | Updated: March 28, 2016 00:05 IST2016-03-27T23:19:45+5:302016-03-28T00:05:42+5:30
बंद सुरूच : सराफांचा सोमवारी रेल रोको; उत्पादन कर विरोधात आक्रमक भूमिकां

महिला सुवर्णकारही आंदोलनात
नाशिक : केंद्र सरकारने सुवर्णकार व्यावसायिकांवर लादलेल्या उत्पादन शुल्काच्या विरोधात सुवर्णकार व्यावसायिकांनी पुकारलेल्या बेमुदत संपात आता महिला सुवर्णकारांनीही उडी घेतली आहे. दरम्यान, सुवर्णकार व्यावसायिकांनी उत्पादन करविरोधी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सोमवारी नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या २७ दिवसांपासून अबकारी करविरोधात संपूर्ण देशभर सराफ सुवर्णकारांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा भाग म्हणून नाशिक सराफ बाजारात गेल्या आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. महिला सुवर्णकारांनीही रविवारी या आंदोलनात उडी घेतली आहे. सुवर्णकारांच्या कुटुंबीयांतील सुमारे सव्वाशे महिलांनी आंदोलनात सहभागी होत दिवसभर उपोषण करीत केंद्र सरकार व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात घोषणाबाजी करून उत्पादन कर वाढीचा निषेध केला. या व्यवसायाशी संबंधित आटणी व्यावसायिक, बंगाली कारागीर आदिंनीही उपोषणात सहभाग घेतला आहे. दरम्यान, मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले व शहर काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या वत्सला खैरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सुवर्णकारांना पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)