भाबडबारी घाट दुरुस्तीसाठी आंदोलन
By Admin | Updated: November 19, 2015 22:25 IST2015-11-19T22:24:03+5:302015-11-19T22:25:08+5:30
दुर्लक्ष : टोल प्रशासन, बांधकाम विभागाविषयी नाराजी

भाबडबारी घाट दुरुस्तीसाठी आंदोलन
देवळा : विंचूर-प्रकाशा-छडवेल राज्यमार्ग क्र.७ वरील देवळानजीकच्या भाबडबारी घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व्हावे व वळण रस्त्यावरील डोंगराच्या खडकांचे नोज कटिंग करून घाटातील खोलदरीच्या बाजूकडील संरक्षक भिंतीची उंची वाढवावी आदि मागण्या अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीकडे करूनही त्याकडे संबंधित दुर्लक्ष
करीत असल्याने मंगळवारी दुपारी झालेल्या पेट्रोल टँकरच्या अपघातस्थळी सटाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र सोनवणे व
त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातस्थळी रांगोळी काढून गांधीगिरी आंदोलन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भाबडघाटात होणारे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या सुधारणासंबंधी निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले आहे की, भाबडबारी घाटातील रस्त्यावरील वळणावर डोंगराळ खडकाच्या भागामुळे लहान-मोठे वाहनचालक वाहनदृष्टीस न पडल्यामुळे छोटे मोठे अपघात होतात. बाजूला १०० ते १५० फूट खोल दरी असून, यापूर्वी अनेक अपघात झालेले आहेत.
खोलदरीच्या बाजूने संरक्षण भिंतीची उंची कमी आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचं तसेच दिशादर्शक, रेडियम रिप्लेक्टर फलक झेब्रा क्रॉसिंग पट्टे, कॅट आय ठिकठिकाणी बसविण्यात यावे. याबाबत कार्यवाही करण्यासंबंधी अधीक्षक अभियंता नाशिक यांना मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना करण्यात आल्या.
मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान मनमाडकडून पिंपळनेरकडे जाणारा पेट्रोलने भरलेला टँकर (एमएच १८ एम ५५६३) व नवापूर- पुणा एसटी (एमएच ४० एन ९६१६) यांच्या अपघात होऊन टँकर संरक्षक भिंत तोडून दरीत जाता जाता वाचल्याने मोठी वित्तहानी व जीवितहानी टळली.
या अपघातानंतर सदर टँकरजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून गांधीगिरी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी दादाजी खैरनार, गिरीश सोनवणे, मोहित सोनवणे, जावेद सय्या, राजबधान, सुदर्शन खैरनार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)