आंदोलन : अधिकाऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडली

By Admin | Updated: August 17, 2016 00:51 IST2016-08-17T00:37:02+5:302016-08-17T00:51:21+5:30

प्रकल्पग्रस्तांच्या कश्यपी धरणात उड्या

Movement: Officials left the air | आंदोलन : अधिकाऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडली

आंदोलन : अधिकाऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडली

नाशिक : कश्यपी धरणग्रस्तांना मोबदला व शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या प्रश्नावरून सोमवारी दुपारी धरणावर तीव्र आंदोलन करण्यात आले. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असतानाच दहा ते बारा तरुणांनी थेट पाण्याने गच्च भरलेल्या धरणातच जलसमाधी घेण्यासाठी उड्या मारल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. परिणामी संतप्त जमावाने शासकीय अधिकाऱ्यांची वाहने उलथविण्याचे तसेच हवा काढण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
कश्यपी धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा पूर्ण मोबदला आणि कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रकल्पग्रस्त शासन दरबारी पाठपुरावा करीत असून, अनेक वेळा उपोषणे, मोर्चे, धरणे आंदोलनही करण्यात आले. परंतु आश्वासनापलीकडे काहीच हाती न लागल्याने सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर थेट धरणाच्या पाण्यातच जलसमाधी घेण्याचे आंदोलन छेडण्यात आले. सकाळपासूनच धरणाला लागून असलेल्या कश्यपीनगरात परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केल्याने पोलिसांनीही बंदोबस्त वाढविला होता. प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदारांनी धाव घेऊन त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याबरोबरच सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. धरणाला लागूनच ही बैठक सुरू असताना अचानक एकनाथ बेंडकुळी, भगवान खाडे, सोमनाथ मोंढे अशा दहा ते बारा प्रकल्पग्रस्त तरुणांनी धरणावर धावत जाऊन थेट पाण्यात उड्या मारल्या. या घटनेमुळे बैठकीचा नूरच बदलून गेला. अचानक तणाव वाढून ज्यांनी पाण्यात उड्या मारल्या त्या तरुणांच्या नातेवाइकांनी धरणाकडे धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ अख्खा गावही धरणाकडे पळाल्याने त्यांच्या अटकावासाठी पोलीस बळही अपुरे पडले. कश्यपी धरण सध्या ९० टक्के भरले असून, पाण्यात उड्या मारणाऱ्या तरुणांचा जीव धोक्यात पडल्याचे पाहून जीवरक्षक दल तसेच गावातीलच काही तरुणांनीच पाण्यात उड्या घेत, जलसमाधी घेऊ पाहणाऱ्यांना बाहेर काढले. यातील सोमनाथ मोंढे या तरुणाला पोहता येत नसल्याने त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेने बिथरलेल्या ग्रामस्थांनी शासकीय अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करीत त्यांच्यावरच चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाहने उलथवून टाकण्यासाठी जमाव प्रयत्नशील होताच, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता गृहीत धरून आणखी पोलीस बळ मागविण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यानच्या काळात आंदोलकांनी काही शासकीय वाहनांची हवाही सोडून दिली. दुपारी दोन वाजेपासून सुरू असलेला हा गोंधळ वाढत गेला. प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे हिरामण खोसकर यांचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या या जमावाला कसेबसे शांत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याचे व तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Movement: Officials left the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.