जिल्हा बॅँकेत नेतृत्व बदलाच्या हालचाली
By Admin | Updated: April 27, 2017 02:17 IST2017-04-27T02:16:56+5:302017-04-27T02:17:05+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावत चालल्याने त्याचा सर्व ठपका जिल्हा बॅँक अध्यक्षांवर ठेवत नेतृत्व बदलाच्या हालचालींना वर्तुळात वेग आला आहे

जिल्हा बॅँकेत नेतृत्व बदलाच्या हालचाली
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्याने त्याचा सर्व ठपका जिल्हा बॅँक अध्यक्षांवर ठेवत नेतृत्व बदलाच्या हालचालींना जिल्हा बॅँक वर्तुळात वेग आला आहे. भाजपाचे सरकार असल्याने भाजपाचाच अध्यक्ष करून सरकारची मदत पदरात पाडून घेण्यासाठी संचालक केदा अहेर व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची नावे नवीन अध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दररोज सुरू असलेल्या आंदोलनांचा धसका घेऊन म्हणा यापूर्वीच जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर शेतकरी व जनसामान्यांची बॅँक असल्याने ही बॅँक वाचविण्यासाठी काहीही करा, प्रसंगी भाजपाचा अध्यक्ष करा, मी राजीनामा देतो, अशी भूमिका जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीत घेतल्याची चर्चा आहे. काही संचालकांनी खासगीत बोलताना अध्यक्षांनी त्यांचा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आमच्याकडे यापूर्वीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.
कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात बहुतांंश जिल्हा बॅँकांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादीचेच अध्यक्ष असल्याने सरकार नेहमीच जिल्हा बॅँकांना मदत करण्याच्या भूमिकेत राहिले होते. प्रसंगी थकहमी घेणे, अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देणे यांसह विविध प्रकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतच जिल्हा बॅँकांना सरकारच्या माध्यमातून झाल्याचे बोलले जाते. आताही केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने सरकारची मदत हवी असेल तर सत्ताधारी पक्षाच्या संचालकांना अध्यक्ष केल्यास जिल्हा बॅँकेची आर्थिक कोंडी फुटू शकते, असा मतप्रवाह काही संचालकांमध्ये आहे. त्यातूनच मग आता अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी आक्रमक नेतृत्व असल्यास वसुलीला अनायसे मदत तर होईलच मात्र रोज उठून होणाऱ्या आंदोलनांनाही चाप बसेल, अशी चर्चा जिल्हा बॅँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)
आव्हान कोण स्वीकारणार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक घडी विस्कटलेली असून, बॅँक अनंत अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे बॅँकेच्या अध्यक्ष बदलाबाबत कोणी संचालक चकार शब्द काढायला तयार नाही. त्यामुळे जिल्हा बॅँकेला सुस्थितीत आणण्याचे आव्हान कोण स्वीकारणार याबाबत जिल्हा बॅँकेच्या सभासद व शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.