गोमांसप्रकरणी आंदोलन
By Admin | Updated: March 20, 2016 23:33 IST2016-03-20T23:31:15+5:302016-03-20T23:33:22+5:30
सिडकोतील घटना : पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

गोमांसप्रकरणी आंदोलन
सिडको : स्टेट बॅँक चौकामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास गोमांस आढळून आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गोमांस फेकणाऱ्या अज्ञात इसमांना अटक करावी अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. दोषींवर कारवाई करावी अशी आक्रमक भूमिका घेत भाजपा सिडको मंडलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चौकात ठिय्या आंदोलन केले.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर गोमांस फेकल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर घटनास्थळी नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येऊन घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. गोमांस फेकून कायदा सुव्यवस्था व धार्मिक भावनांना तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नाशिक-मुंबई महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कार्यकर्त्यांनी रस्ता रोखल्याची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक सुधाकर बडगुजर, अरविंद शेळके यांनीही भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आंदोलकांची समजूत काढत अज्ञात समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या सोडले. या आंदोलनात माजी सिडको मंडल अध्यक्ष जगन पाटील, अध्यक्ष गिरीश भदाणे, मुकेश शहाणे, शेखर निकुंभ, शिवाजी बरके, गणेश ठाकूर, ललिता भावसार, अशोक पवार, प्रदीप पेशकार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.