चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन
By Admin | Updated: August 19, 2016 00:22 IST2016-08-19T00:21:59+5:302016-08-19T00:22:45+5:30
निषेध : बागलाण तालुक्यातील आदिवासी संघटना एकवटल्या; तहसीलदारांना निवेदन

चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन
सटाणा : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी बोलावल्या आढावा बैठकीस विविध खातेप्रमुखांनी पाठ फिरविल्याच्या निषेधार्थ संजय चव्हाण यांनी बागलाण तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकल्याच्या प्रकाराला गुरुवारी वेगळे वळण मिळाले. गटविकास अधिकारी आदिवासी समाजाचा असल्यामुळेच त्यांच्यावर हा अन्यायकारक प्रकार केल्याचा निषेध करत सुमारे तीनशे ते साडेतीनशे आदिवासींनी तहसीलदार सुनील सौंदाणे यांची भेट घेऊन कार्यालयाला टाळे ठोकून अन्याय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.
संजय चव्हाण यांच्यासह पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे, जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार बच्छाव, संजय सोनवणे, वैभव गांगुर्डे, राकेश सोनवणे, लखन जाधव आदि कार्यकर्त्यांनी बागलाणचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते. आमदार चव्हाण यांच्या सूचनेनुसार गेल्या मंगळवारी प्रांताधिकारी संजय बागडे यांनी विविध खातेप्रमुखांची आढावा बैठक बोलावली होती. बहुतांश खातेप्रमुखांनी या आढावा बैठकीकडे पाठ फिरविल्याने संजय चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून संताप व्यक्त केला होता. दरम्यान, मंगळवारी झालेल्या या प्रकाराला गुरुवारी वेगळेच वळण मिळाले. आज दुपारी अचानक तालुक्यातील आदिवासींच्या विविध संघटनांच्या तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्त्यांचा जमाव थेट तहसील कार्यालयावर चाल करून गेला. यावेळी संतप्त आदिवासी बांधवांनी आदिवासींवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करून बागलाणचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम हे आदिवासी समाजाचे असल्यामुळेच त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून त्यांना हीन वागणूक दिली गेल्याचा निषेध व्यक्त केला. टाळे लावून अशा पद्धतीने आदिवासी अधिकाऱ्यावर अन्याय करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा संपूर्ण आदिवासी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना दिला. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती जिजाबाई सोनवणे, डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, भाजपा आदिवासी आघाडीचे कन्हू गायकवाड, भटू महाले, राजेंद्र गांगुर्डे, पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, परशुराम सोनवणे, त्र्यंबक बापू सोनवणे, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नारायण खैरनार, रामदास सोनवणे, एकनाथ सोनवणे, अण्णा मोरे, राम सोनवणे, बापू अहिरे, भास्कर गांगुर्डे, जयवंतीबाई चौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पोपट गवळी, दादाजी माळी, पंडित दळवी आदि उपस्थित होते.