बिबट्याने केला मोटरसायकलचा पाठलाग
By Admin | Updated: August 14, 2016 01:45 IST2016-08-14T01:35:44+5:302016-08-14T01:45:35+5:30
एकजण जखमी : सायखेडा-सोनगाव रस्त्यावरील घटना

बिबट्याने केला मोटरसायकलचा पाठलाग
निफाड : सायखेडा सोनगाव रस्त्याने जाणाऱ्या सोनगाव
येथील मोटारसायकलस्वाराचा बिबट्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सुमारे अर्धा किमीपर्यंत पाठलाग करून जखमी केल्याची घटना घडली़
सोनगाव येथील सुभाष शंकर कारे हे सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसीमध्ये नोकरीला
आहेत़ शुक्रवारी रात्री कारखान्यातील काम संपल्यानंतर कारे हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर मोटारसायकलने घराकडे येत असताना रात्री १२ ते १२़३० च्या दरम्यान, सायखेडा गावापासून पुढे १ किमी अंतरावर आल्यानंतर सायखेडा सोनगाव रस्त्याजवळील भारत गॅस एजन्सीजवळ अचानक बिबट्याने कारे यांच्या मोटारसायकलवर झेप घेऊन कारे यांच्या पायावर हल्ला केला़ त्यामुळे कारे यांनी क्षणाचाही विचार न करता मोटरसायकलचा वेग वाढवला तरीही बिबट्याने अर्धा किमीपर्यंत त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला़
त्यावेळेस समोरून काही वाहने आल्यानंतर बिबट्या रस्त्याच्या बाजूला पसार झाला़ त्यानंतर जखमी कारे याना तातडीने नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात हलवण्यात आले़
त्याच्या पायाला जखम झाली आहे घटनेची माहिती मिळताच येवला वन विभागाचे वन परी क्षेत्र अधिकारी बी.आर.ढाकरें, मनमाड चे वनपाल ए. पी.काळे, वनरक्षक विजय टेकणर यांनी घटनास्थळी भेट दिली.
पंचनामा केला जखमी कारे यांची भेट घेतली बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अविनाश खालकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे़(वार्ताहर)