वेदनांवर ‘आई’पणाची मात
By Admin | Updated: May 10, 2015 00:05 IST2015-05-10T00:01:27+5:302015-05-10T00:05:22+5:30
माणुसकी : वेश्यावस्तीतल्या दोन महिलांनी इतरांच्या लेकरांना दिली मातेची माया

वेदनांवर ‘आई’पणाची मात
नाशिक : ‘त्यांच्या’ स्वत:च्या वाट्याला नरकाचे जिणे आलेले... आयुष्यभर पुरुषी वासनांचे विखारी चोचले पुरवताना त्यांची मने कठोर होण्याचीच शक्यता अधिक; पण तसे न होता त्यांच्या मनांत संवेदनेचे झरे वाहत राहिले... या झऱ्यांचा स्पर्श काही चिमुकल्यांना झाला अन् त्यांची आयुष्ये निर्मळ तर झालीच; पण ती झऱ्यासारखीच प्रवाही होऊन गेली...
नाशिकमधल्या एका वेश्यावस्तीतल्या या दोन कहाण्या. स्वत:च्या पोटच्या पोराला तर कोणीही सांभाळतेच; पण वेश्यावस्तीत अन् त्या व्यवसायात राहूनही दुसऱ्याची उघड्यावर आलेली मुले सांभाळून त्यांना मोठे करणाऱ्या, त्यांची लग्ने लावून देणाऱ्या दोन जिगरबाज महिलांची ही कहाणी सामान्यांसाठीही प्रेरणादायी ठरावी.
शहरातील एक प्रमुख वेश्यावस्ती. कळवण तालुक्यातील एका महिलेला तिच्या नवऱ्यानेच येथे आणून विकले. या महिलेला तीन वर्षांची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा. कालांतराने महिलेचा पती मुलाला आपल्याबरोबर घेऊन गेला. उरले फक्त माय-लेक. त्यातल्या या महिलेनेही पुढे अनेक दादले बदलले अन् एकाचा हात धरून तिने वस्तीतून पलायन केले. पोटच्या पोरीला त्या नरकात तसेच ठेवून... ही चिमुकली तिथेच राहिली असती, तर तिचे पुढे काय होणार, हे ठरलेलेच; पण त्या घराच्या मालकिणीचे हृदय त्या चिमुकलीला पाहून द्रवले. जे आपण आयुष्यभर सोसले, ते या पोरीला सोसू द्यायचे नाही, असा निर्धार तिने केला आणि ती या पोरीला स्वत:च्या घरी घेऊन गेली. तिला आपल्या दोन्ही पोरांबरोबर मायेने वाढवले, तिच्यासाठी चांगला मुलगा शोधला, स्वत:च्या पदरचे चक्क तीन लाख रुपये खर्चून तिचे थाटामाटात लग्न लावून दिले. आज या मुलीला दोन मुले आहेत... आपल्या संसारात ती रमून गेली आहे... हे सारे त्या माउलीमुळे घडले, जिने स्वत: वेदना सोसून दुसऱ्याच्या पोरीला वाढवले अन् या अंधारलेल्या वस्त्यांमध्येही माणुसकीचे दिवे पेटलेले असतात, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले...