शहरात ‘स्वाइन फ्लू’चे सर्वाधिक संशयित रुग्ण
By Admin | Updated: March 20, 2015 23:49 IST2015-03-20T23:47:54+5:302015-03-20T23:49:03+5:30
स्वाइन फ्लू कक्षात १५ रुग्णांवर उपचार सुरू; चार नव्याने दाखल

शहरात ‘स्वाइन फ्लू’चे सर्वाधिक संशयित रुग्ण
नाशिक : स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणारे सर्वाधिक संशयित रुग्ण हे नाशिक शहरातील असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येते़ दरम्यान, शुक्रवारी (दि़२०) चार रुग्ण नव्याने दाखल झाले असून, या कक्षातील रुग्णांची संख्या १५ झाली आहे़ नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात आजमितीस १५ रुग्ण उपचार घेत असून, त्यामध्ये आठ पुरुष व सात महिलांचा समावेश आहे़ तसेच या कक्षातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, त्या सर्व महिला आहेत, तर शुक्रवारी नव्याने चार संशयित रुग्ण दाखल झाले आहेत़ यातील काही रुग्णांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे़
शुक्रवारी दाखल झालेले चार रुग्णांपैकी तीन रुग्ण हे शहरातील तर एक ग्रामीण भागातील आहे़ पोलीस मुख्यालय, उंटवाडी, जुने नाशिक या परिसरातील हे तीन रुग्ण असून, एक रुग्ण हा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील आहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात आतापर्यंत दाखल होणाऱ्या संशयित रुग्णांमध्ये नाशिक शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)