शिवसेनेच्या सर्वाधिक रणरागिणी
By Admin | Updated: February 25, 2017 01:28 IST2017-02-25T01:27:17+5:302017-02-25T01:28:04+5:30
पंचायत समिती : विजयी महिलांमध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी मते

शिवसेनेच्या सर्वाधिक रणरागिणी
संजय दुनबळे : नाशिक
जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये विजयी झालेल्या एकूण ७६ महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी मते मिळवून विजयी होण्याचे दोन्हीही विक्रम शिवसेनेच्या नावावर जमा झाले आहेत. येवला तालुक्यातील सावरगाव गणातील शिवसेनेच्या उमेदवार आशाताई कांतीलाल साळवे यांना सर्वाधिक (७९४३), तर इगतपुरी तालुक्यातील खेड गणातील शिवसेनेच्या उमेदवार जया रंगनाथ कचरे यांनी सर्वात कमी (२३०१) मते मिळाली आहेत. जिल्ह्यातील एकूण १५ पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या अनेक महिला नवख्या असून, पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. पंचायत समित्यांमध्ये महिलांना ५० टक्के राखीव जागा दिल्या गेल्याने ज्यांना शक्य झाले त्या राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली. काही पक्षांना उमेदवारी देण्याची इच्छा असूनही महिला उमेदवार मिळाल्या नाहीत. पक्षीय उमेदवारांबरोबरच अनेक महिलांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावून पाहिले; मात्र त्यांना विजय मिळाला नाही. केवळ सटाणा तालुक्यातील पठावे दिगर गणातून केदूबाई राजू सोनवणे (६२७२) या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या. मात्र या अपक्ष उमेदवारांनी घेतलेली मते पक्षीय उमेदवारांना काहीशी अडचणीची ठरली.
भाजपा तिसऱ्या क्रमांकावर
सर्वाधिक जागा मिळवून जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दावा सांगणाऱ्या शिवसनेने पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक महिला उमेदवार निवडून आणत बाजी मारली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक ३७ महिला विजयी झाल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या १६ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष महिला उमेदवारांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला असून, या पक्षाच्या १२ महिला विजयी झाल्या आहेत. कॉँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या पक्षाच्या केवळ पाचच महिला विजयी झाल्या आहेत.