यादीतून नावे गायब होण्याच्या सर्वाधिक तक्रारी

By Admin | Updated: February 22, 2017 01:41 IST2017-02-22T01:41:41+5:302017-02-22T01:41:54+5:30

हिरावाडीत सौम्य लाठीमार इंदिरानगरात स्लिप यंत्र जप्त नाशिकरोडला अनेक वंचित

Most of the complaints of names disappear from the list | यादीतून नावे गायब होण्याच्या सर्वाधिक तक्रारी

यादीतून नावे गायब होण्याच्या सर्वाधिक तक्रारी

पंचवटी : हिरावाडीतील मनपा शाळा क्रमांक ५५ बाहेरील परिसरात टोळक्याने उभे राहून ये-जा करणाऱ्या मतदारांना विनवणी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलीस टोळक्याच्या मागे दंडुका घेऊन लागल्याने कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. मनपा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रभाग क्रमांक ३ मधील मायको शाळा क्रमांक ५५ येथे सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी गर्दी केलेली होती. दुपारी मतदान केंद्राबाहेरच्या परिसरात गर्दी होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना सूचना देऊन परिसर खाली करण्याची विनवणी केली, मात्र जमावाने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने घटनास्थळी पोलीस बळ दाखल झाले त्यांनी तत्काळ जमावाला पांगविण्यासाठी जमावाच्या दिशेने काठ्या फेकल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांसह उमेदवारांचीही पळापळ झाली.  इंदिरानगर : राणेनगर, राजीवनगर, इंदिरानगर, विजयनगर आदि भागात सकाळी सुमारे २ ते ३ तास मतदान संथ गतीने झाले. परंतु दुपारनंतर अनेक केंद्रांवर गर्दी व रांगा दिसत होत्या. दुपारी जाजू विद्यालय या मतदान केंद्राबाहेर एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचे चिन्ह असलेल्या स्लिपा वाटपामुळे मतदान स्लिप काढणारे यंत्र जप्त करण्यात आले. मतदार यादीत नावे सापडत नसल्याने या ठिकाणी नावे शोधण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी एका उमेदवाराचे चार कार्यकर्ते मतदारांना पक्षाचे चिन्ह असलेल्या मतदार स्लिपा वाटप करत होते. त्यामुळे पोलिसांनी सदर यंत्र, कार्यकर्त्यांकडून जप्त केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांसमवेत वाद घालण्याचा प्रयत्न केला असता आपले यंत्र मतदान संपल्यावर सायंकाळी मिळेल, असे सांगितले.  नाशिकरोड : मतदार यादीतील घोळामुळे असंख्य मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. उमेदवार व निवडणूक विभागांकडून दिलेल्या काही मतदान स्लिपा चुकीच्या असल्यामुळे मतदारांना आपला हक्क बजाविण्यासाठी धावाधाव करावी लागली. तसेच एकाच घरातील दोघा मतदारांचे वेगवेगळ्या मतदान केंद्रात किंवा वेगवेगळ्या प्रभागात मतदानासाठी नाव असल्याने सदोष मतदार यादीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. काही मतदारांची नावेच मतदान यादीतून वगळण्यात आल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तर काही मतदान केंद्रावर खोट्या ओळखपत्राद्वारे बोगस मतदान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे काही मतदारांना पुन्हा घरचा रस्ता धरावा लागला. तर काहींनी आपली ओळख पटवून दिल्यानंतर त्यांना मतदान करून देण्यात आले. त्याप्रमाणेच मतदान केंद्राच्या नावातील गोंधळामुळेदेखील मतदारांना केंद्र शोधण्यास अडचण निर्माण झाली. समाजमंदिर आणि मनपा शाळा असा उल्लेख करताना प्रशासनाकडून चुका झाल्याने नेमके मतदान कोठे आहे याबाबत संभ्रमावस्था होती.

Web Title: Most of the complaints of names disappear from the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.